‘थर्टी फर्स्ट डिसेंबर’  साजरा करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यालय आणि पहाटे १ वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र १ दिवसाच्या परवान्यासाठी पाच व दोन रुपये फी मोजावी लागणार आहे. सांगली जिल्ह्यात या एका दिवसात सुमारे ७० हजार लिटर मद्याची विक्री होण्याचा अंदाज आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी सांगितले, की या कालावधीत मद्याची तस्करी रोखण्यासाठी पोलीस दलाबरोबरच उत्पादन शुल्क विभाग दक्ष आहे. गोव्याहून येणाऱ्या रेल्वे व बसची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय म्हैसाळ, जत, राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी अवैध दारू आयात केली जाणार नाही हे पाहण्यासाठी ४ पथके तनात करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात ४१० परमिट रूम असून बीअर शॉपी २५ आहेत. देशी मद्य विक्रीची २२० दुकाने आहेत. या ठिकाणाहून होणाऱ्या मद्यविक्रीपासून २७ ते ३० कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळतो. जिल्ह्यातील देशी मद्याची विक्री महिन्याला ८ लाख ५० हजार लीटर असून विदेशी मद्य ३ लाख लीटर मद्यपींकडून फस्त केले जाते. तर जिल्ह्यात सुमारे अडीच लाख लीटर बीअरची महिन्याला विक्री होते.
सरत्या वर्षांला निरोप आणि उगवत्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. यासाठी मद्यप्राशनाचा परवाना घेणे बंधनकारक असल्याचे गोसावी यांनी सांगितले. जिल्ह्यातील बहुतांशी हॉटेल, धाबे या ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी जय्यत तयारी केली असून, बुकिंगही सुरू केले आहे. खासगी फार्म हाऊसवर होणाऱ्या पार्टीसाठीही मद्य पिण्याचा परवाना आवश्यक असल्याचे अधीक्षक  गोसावी यांनी सांगितले. १  दिवसाच्या परवान्यासाठी विदेशी मद्यासाठी ५ रुपये आणि देशी मद्यासाठी २ रुपये असा दर असून चालू वर्षी मद्यविक्रीत सात टक्के वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी दिला आहे. शहरासह ग्रामीण भागातही अनुचित प्रकार टाळण्यासाठी व तरुणांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.