वाडिया पार्क क्रीडा संकुलातील गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्या (शुक्रवार) होणार आहे. दरम्यान, संकुलाच्या विकसकाने खंडपीठाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेवर येत्या दि. २७ ला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी विकसकाची पुनर्विचार याचिका खंडपीठाने मागेच पेटाळून लावली आहे.
वाडिया पार्क क्रीडा संकुलातील शहराकडील रस्त्यालगत विकसकाने बांधलेल्या दोन व्यापारी इमारती (ए आणि बी विंग) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बेकायदेशीर ठरवून त्या पाडण्याचा आदेश दिला आहे. आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभागीय महसूल आयुक्तांवर सोपवण्यात आली असून, त्यांनी त्यासाठी नगरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
आदेशाच्या अंमलबजावणीसाठी खंडपीठाने कालबद्ध कार्यक्रमच ठरवून दिला असून, त्यानुसार पाटील यांनी कारवाई सुरू केली आहे. पाटील यांनी येथील गाळेधारकांना नुकत्याच नोटिसा बजावून येत्या दि. २८ पर्यंत हे गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दि. २९ला पुढील कारवाई होणार आहे. या कारवाईने गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे. चरितार्थाचा विचार करून हे गाळे नियमित करावे अशी याचिका त्यांनी खंडपीठात दाखल केली आहे. त्यावर बुधवारी गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. पुढील सुनावणी उद्या (शुक्रवारी) ठेवण्यात आली आहे. गाळेधारकांच्या वतीने वकील नितीन गवारे काम पाहात आहेत.
दरम्यान, खंडपीठाच्या आदेशाच्या पार्श्र्वभूमीवर झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत खंडपीठातच याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे ठरले होते. त्यानुसार ही याचिकाही दाखल करण्यात आली होती, मात्र ती खंडपीठाने फेटाळून लावल्याने विकासकाने आता या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर येत्या दि. २७ ला सुनावणी होणार आहे.