दारणा-गंगापूर समूहातील हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळावे तसेच राज्यमार्गावर कोल्हार ते कोपरगाव दरम्यान रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे, खड्डय़ांची डागडुजी करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्या (मंगळवार) रोजी राहाता येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, दारणा गंगापूर धरण समूहातील पाणी शेतीऐवजी उद्योगास देण्याकडे शासनाचा वाढता कल आहे. शासनाच्या या उद्योगधार्जिण्या निर्णयामुळे या धरण समूहातील शेती व्यवसाय मोडकळीस आलेला आहे. ओव्हरफ्लोच्या पाण्यातून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाणी द्यावे. साठवण तळी व साकळी बंधारे भरून द्यावेत ही या भागातील शेतक-यांची मागणी आहे. मात्र शासनाने सन २००५ मध्ये घेतलेल्या समान जलनीतीच्या निर्णयाच्या आधारे नदी पात्रात पाणी सोडून कालवा लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या तोंडाला पाने फुसली. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध जाब विचारण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले.
कोल्हार ते कोपरगाव या राज्यमार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. या महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाच्या तिजोरीतून जवळपास ८० लाख रुपयांचा निधी लटला, मात्र खड्डय़ांचा आकार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गावरील खड्ड्यांच्या वाढत्या संख्येमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. मनुष्यहानीबरोबरच वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. शासनाच्या या वेळकाढू व डागडुजीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली. सत्ताधा-यांचा व प्रशासनाचा हा सावळा गोंधळ जनता यापुढे सहन करणार नाही. राज्यमार्गाचे कोल्हार ते कोपरगाव दरम्यानचे काम तातडीने हाती घ्यावे आदी मागण्या या पत्रकात करण्यात आल्या आहेत.