हिवाळी अधिवेशनापूर्वी शहरातील टोलविरोधी आंदोलनाने उचल खाल्ली असून, उद्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गेले आठवडाभर टोलविरोधी कृती समितीने जनजागृती अभियान राबविल्याने ठिय्या आंदोलन ताकदीने पार पडणार असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देताना काही अटी व शर्तीचे पालन करण्याचे बंधन घातले आहे. दरम्यान, शहरातील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर आयआरबी कंपनीने १७ ऑक्टोबरपासून टोल वसुली केली आहे. तेव्हापासूनच टोलविरोधी कृती समितीने टोलला विरोध करीत रस्त्यावरचे आंदोलन छेडले आहे. गेल्या आठवडय़ात एका टेम्पोचालकास झालेल्या मारहाणीमुळे पुईखडी टोलनाका नागरिकांनी उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी संजय पवार, विजय देवणे या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर टोलविरोधातील आंदोलन आणखी उग्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला होता.     
गेले काही दिवस कृती समितीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत ठिय्या आंदोलन यशस्वी करण्याची जनजागृती केली जात आहे. बैठका, सभा या माध्यमातून जनमत संघटित केले जात आहे. विविध संघटना, जातिधर्माच्या संघटना, बार असोसिएशन अशा विविध स्तरांतून ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असल्यामुळे शनिवारचे आंदोलन ताकदीने होणार असल्याचे दिसत आहे. तर या आंदोलनाला परवानगी देताना पोलिसांनी महावीर गार्डन जवळ आंदोलन करणे, कोणाचा निषेध न करणे, व्यक्तिगत टीका टाळणे अशा अटी आंदोलकांना घातल्या आहेत. आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनस्थळी ३५० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. त्यामध्ये मुख्यालयातील १०० पोलीस, राज्य राखीव दलाची तुकडी, दोन पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपअधीक्षक यांचा समावेश आहे. तर हिवाळी अधिवेशनामध्ये टोलविरोधात आवाज उठविणार असल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.