06 July 2020

News Flash

आजचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा

लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवारी संपुष्टात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, या दिवशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

| April 22, 2014 07:01 am

लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवारी संपुष्टात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, या दिवशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. महायुती, काँग्रेस आघाडी व मनसे यांच्यातर्फे प्रचार फेरी काढली जाणार असताना दुसरीकडे जिल्हा निवडणूक शाखेने डाव्या आघाडीच्या फेरीला परवानगी नाकारली. या व्यतिरिक्त आम आदमी पक्ष व बसपा ‘रोड शो’द्वारे वातावरण ढवळून काढणार आहे. वेगवेगळ्या पक्षांतर्फे विविध भागात काढल्या जाणाऱ्या प्रचार फे ऱ्यांमुळे वाहतूक कोंडीचे संकट पुन्हा उभे ठाकले आहे.
नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधी जाहीर प्रचार संपुष्टात येतो. मागील तीन ते चार आठवडय़ांपासून प्रचारात गुंतलेले उमेदवार व राजकीय पक्षांनी अखेरच्या दिवशी प्रचार फेरीद्वारे शहरात शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे. काही प्रबळ उमेदवारांकडून ऐनवेळी चित्रपट कलावंतांना सहभागी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न होऊ शकतो. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सकाळी दहा वाजता फेरी काढली जाणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकापासून फेरीला सुरुवात होईल. नंतर कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, गंगापूर रोड वरून अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपती मंदिरात या फेरीचा समारोप होणार आहे. यावेळी पक्षाचे संपर्क मंत्री रवींद्र मिर्लेकर, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगर प्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ पंचवटी परिसरात फेरी काढली जाणार आहे. शहरातील मध्यवस्तीत वाहतुकीला अडथळे येऊ नये म्हणून मनसे पंचवटी परिसर अक्षरश: पिंजून काढणार आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत पंचवटी कारंजा येथून या फेरीला सुरुवात होईल. दिंडोरी रोड, म्हसरूळ, पोकार कॉलनी, कलानगर, महालक्ष्मी चित्रपटगृह, निमाणी बस स्थानक, आडगांव नाका, हिरावाडी, कमलनगर, श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव, विडी कामगारनगर, हनुमाननगर, सरस्वतीनगर, कोणार्कनगर, आडगांवमार्गे नांदुर, तपोवन, टकलेनगर, काटय़ा मारुती मंदिर, नागचौक, ढिकलेनगर, काळाराम मंदिर, शिवाजी चौक, मालविया चौक, शनी चौक, मुठे गल्ली, सरदार चौक, रामकुंड, अंबिका चौक आदी भागातून मार्गस्थ होऊन फेरीचा पंचवटी कारंजा येथे समारोप होईल.
काँग्रेस आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून फेरीला सुरुवात होणार आहे. यावेळी विनायकदादा पाटील, शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे आदी पदाधिकारी उपस्थित राहतील. अशोकस्तंभमार्गे रविवार कारंजा, मेनरोड, गाडगे महाराज पुतळा, दामोदर टॉकीज, सायंतारा, दूध बाजार, गंजमाळ, त्र्यंबक नाका, मध्यवर्ती बसस्थानकमार्गे काँग्रेस कमिटी कार्यालयात फेरीचा समारोप होईल. बहुजन समाज पार्टीच्या वतीने उमेदवार दिनकर पाटील यांच्या सातपूर येथील निवास स्थानापासून फेरी काढण्यात येईल. पक्षाचे जिल्हा तसेच राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरणार आहे. डाव्या आघाडीने अ‍ॅड. तानाजी जायभावे यांच्या प्रचारार्थ या दिवशी मोटार फेरीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, निवडणूक शाखेने सुरक्षितता, वाहतूक आदी कारणांसाठी त्यांना परवानगी नाकारली आहे. आपचे उमेदवार विजय पांढरे यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड, बिटको पॉइंट, विहितगाव, देवळाली कॅम्प परिसरात फेरी काढली जाणार आहे. अखेरच्या दिवशी प्रचार फेऱ्यांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2014 7:01 am

Web Title: todays day is show of force
Next Stories
1 शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांचा कस
2 अपक्ष उमेदवारांची अनोखी प्रचार शैली
3 बौध्द धर्माचा पाया वैज्ञानिक तत्वांवर आधारीत- गौतम गायकवाड
Just Now!
X