आजच्या तरुणांचे वाचन कमी होत चालले आहे, असा सूर अनेकदा व्यक्त केला जातो. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या काही मोजक्या शहरांचे अपवादवगळता उर्वरित महाराष्ट्रातील तरुण पिढी ज्ञानवर्धक साहित्य मोठय़ा प्रमाणात वाचत आहेत. जागतिक राजकारण, अर्थकारण, यशस्वी व्यक्तींची चरित्रे, नवे बदल, सुधारणा यांच्यासारखे ज्ञानवर्धक साहित्य वाचणारा हा तरुण ललित साहित्यात अडकून पडत नाही. त्यामुळेच येथील मंडळींना तरुणांमधील वाचन कमी झाले आहे असे वाटत असावे, असे मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केले.
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नौपाडा केंद्राच्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्ताने आयोजित शारदोत्सव कार्यक्रमात गिरीश कुबेर यांची मुलाखत प्रा. विद्याधर वालावलकर यांनी घेतली. कै.ग.ल.जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ठाण्यातील श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाई, साहित्य आणि जागतिक राजकारण यांच्या विषयाची त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाला. साहित्य क्षेत्रात अनेक मान्यवरांनी खूप मोठे काम करून ठेवले आहे. आपण तितके काम करू शकत नाही, किमान या महनीय व्यक्तींनी केलेले कार्य आपण वाचून मात्र काढू शकतो, असे प्रतिपादन कुबेर यांनी यावेळी केले.
मराठी ललित साहित्याचा दर्जा घसरलेला आहे. त्यामुळेच आजची तरुणाई ते वाचत नाही, असे परखड मत व्यक्त करताना हा दोष तरुणांचा नाही तर आजच्या पिढीतल्या प्रकाशकांचा आणि लेखकांचा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तरुण पिढी जर पुस्तकाकडे वळत नसेल, तर त्यांना हवी असतील अशी पुस्तके निर्माण करा, असे आवाहनही कुबेर यांनी यावेळी केले.
भारतामध्ये लोकशाही असली तरी अप्रामाणिकपणामुळे येथील लोकशाही प्रभावी ठरत नाही. अमेरिकेसारखा देश तेथील कायद्याचे तंतोतंत पालन करतो आणि म्हणूनच राष्ट्राध्यक्षांवरदेखील कायद्याचा भंग केल्याप्रकरणी शिक्षा, दंड होऊ शकतो. तेथील व्यवस्था सक्षम असून व्यवस्था मानणारे लोक तेथे आहेत. त्यामुळेच ते महासत्ता आहेत. तेथील राजकारण्यांनी ठेवलेला दूरदृष्टिकोनदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याकडे नव्या संकल्पना जन्मास घातल्या जात नाहीत, कारण त्यामागे आपली शिक्षणपद्धती कारणीभूत आहे.
पाश्चिमात्यांच्या अनुकरणामुळे आपल्या देशाला भारतीय दृष्टीने विचार करणारे नेतृत्व अत्यंत मोजक्याच वेळी मिळाले आहे. तेलाचा आणि ऊर्जावादाचा इतिहास हा विषय खूपच रंजक असल्याने पुस्तकातून उलगडताना तो खूपच वाचनीय झाला. शिवाय त्यामुळेच मराठीमध्ये तेलविषयक जागृती निर्माण होऊ शकली, असे या पुस्तकांचे वाचक सांगतात तेव्हा आनंद वाटतो असे गिरीश कुबेर म्हणाले.