महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलविरोधातील प्रक्षोभक भाषणाचे पडसाद परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी उमटले. रविवारी रात्री परभणी-गंगाखेड रस्त्यावर तोडफोड, तर सोमवारी आंदोलन करून कार्यकर्त्यांनी टोलवसुली थांबवली. टोल नाका तोडफोड प्रकरणात ६ कार्यकर्त्यांना अटक झाली, तर सोमवारच्या निदर्शनप्रकरणी २४ जणांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.
राज ठाकरेंच्या मुंबईतील भाषणाचे सर्वत्र पडसाद उमटून रात्रीपासूनच टोलविरोधात विविध ठिकाणी मनसे कार्यकत्रे रस्त्यावर आले. परभणीतील एकमेव ब्राम्हणगाव फाटय़ानजीकचा टोलनाका मनसैनिकांनी रात्री फोडला. सोमवारी सकाळी जिल्हाध्यक्ष बालाजी मुंढे व शेख राज यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्रे टोलनाक्यावर धडकले. तेथे घोषणा देत टोलवसुली बंद पाडली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती.
ग्रामीण पोलिसांनी मुंढे, शेख, सचिन पाटील, सुशीला चव्हाण, लक्ष्मण रेंगे, धनंजय भेंडेकर, विश्वास कऱ्हाळे, बाबा कातकडे आदींसह २४ जणांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री झालेल्या तोडफोडप्रकरणी बालाजी मुंढे, शेख राज, विनोद दुधगावकर, सोनू लाहोटी, अमोल देशमुख, अमोल देवठाणकर यांना अटक करुन सोमवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
जालन्यात तोडफोड
जालना – जालना-मंठा रस्त्यावरील डुकरी-पिंपरी फाटय़ाजवळ असलेल्या पथकर वसुली नाक्याची रविवारी मध्यरात्रीनंतर तोडफोड करण्यात आली. मौजपुरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला. रविवारी मध्यरात्रीनंतर सहा-सातजणांनी या नाक्यावर हल्ला करून केबिनच्या काचा, लाईट, सीसीटीव्ही कॅमेऱ्या वायरची तोडफोड केली. तसेच संगणकाचीही नासधूस करण्यात आली.
नांदेडात पाचजणांवर गुन्हा
नांदेड – मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाचे नांदेड जिल्ह्यात पडसाद उमटले. मनसनिकांनी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड आंदोलन केले. बिलोली पोलिसांनी या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हैदराबाद मार्गावर बिलोलीलगत के. टी. कन्स्ट्रक्शन कंपनीचा टोलनाका आहे. सकाळी नऊ वाजता जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, संभाजी जाधव, प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्रे तेथे जमले. टोलनाक्याची तोडफोड करीत त्यांनी हा टोलनाका बंद पाडला. मनसेच्या आंदोलनानंतर बंद झालेला टोलनाका सायंकाळी उशिरा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. आंदोलनामुळे बिलोलीत काही काळ खळबळ उडाली.
उस्मानाबादेतही उद्रेक
उस्मानाबाद – टोलवसुली बंद करा, या मागणीसाठी तालुक्यातील देवसिंगा (तुळ) व उमरगा तालुक्यातील येणेगूर टोलनाक्यांवर मनसैनिकांनी धडक मारली. देवसिंगा येथील लोकमंगल समुहातर्फे चालविण्यात येणाऱ्या टोलनाक्याची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, प्रशांत नवगिरे यांच्यासह ८ कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील टोलनाक्यावर दुपारी दीडच्या सुमारास मनसैनिक धडकले. टोल न घेता वाहने सोडण्याची मागणी करीत घोषणाबाजी केली व टोलनाक्याच्या कक्षाची तोडफोड केली. यात टोलनाक्याचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. तुळजापूरचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हाध्यक्ष देवकते, नवगिरे, राजेश चुंगे, सुरज कोठावळे, हरिदास जाधव, पृथ्वीराज जाधव, विवेक नवगिरे व लखन परमेश्वर या आठजणांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आठही जणांना अटक झाली. कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती.
येणेगूर येथेही मनसैनिकांनी टोलवसुली बंद पाडली. येथे २००२पासून टोलनाका सुरू आहे. माहिती मिळताच मुरूमचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद िनगदळे, कर्मचारी गोरोबा कदम, धनू चव्हाण, किरण औताडे यांनी घटनास्थळी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उमरग्याचे पोलीस उपअधीक्षक एम. राजकुमार यांनी बंदोबस्त वाढविण्याचे आदेश दिले. टोलवसुली बंद केल्यामुळे संबंधित पाटील अॅन्ड कंपनीचे दिवसभरात ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती व्यवस्थापक वैभव पाटील यांनी दिली.