सांगली बायपास रस्त्यावर सुरू असणा-या टोलविरुद्ध आंदोलनाला सोमवारी िहसक वळण लागले असून, कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून फलकाची नासधूस केली. या प्रकरणी भाजपच्या महिला आघाडी राज्य कार्यकारिणीच्या सदस्य नीता केळकर, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग ९ दिवस आंदोलनामुळे टोलवसुली बंद आहे.
आयर्विन पुलाला खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलासाठी अशोक बिल्डकॉन कंपनीने टोलवसुली कार्यालय सांगली-इस्लामपूर रोडवर उभारले आहे. या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी टोलविरोधी कृती समितीच्या झेंडय़ाखाली गेले ९ दिवस टोल हटावसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी कार्यकर्त्यांनी कंपनीच्या अस्थायी कार्यालयावर चाल करून कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माजी आ. नितीन िशदे, भाजपच्या नीता केळकर, सतीश साखळकर, महेश पाटील, शंकरराव चिंचकर, प्रियानंद कांबळे, विजय मौर्य, स्वप्नील कुंभोजकर, उमेश देशमुख या अन्य २० ते २५ कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना टोलवसुली बंद करावी असे सांगत आम्ही कोणत्याही स्थितीत टोलवसुली बंद करणार आहे. तुम्ही चालते व्हा असे म्हणत धमकावल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. नीता केळकर यांनी कार्यालयाला कुलूप ठोकून कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच लावण्यात आलेल्या बोर्डाची नासधूस करून १० हजारांचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.