टोलआकारणीस जोरदार विरोध करीत रविवारी शहरातील सर्व नाक्यांची प्रचंड नासधूस करण्यात आली असली तरी गुरुवारी आयआरबीच्या कर्मचा-यांनी टोल नाक्यांच्या साफसफाईस प्रारंभ केला. फुलेवाडी टोल नाक्याजवळ झाडलोटीचे काम हाती घेण्यात आले होते. तथापि ही प्रक्रिया स्वच्छतेची असल्याने त्यास विरोध केला नाही, पण टोलवसुलीची प्रक्रिया सुरू झाल्यास तो प्रयत्न हाणून पाडले जाईल, असे टोलविरोधी कृती समितीने स्पष्ट केले.    
शहरातील टोलआकारणीस स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. यातून रविवारी नागरिकांनी टोल नाके पेटवून देण्याबरोबरच त्याचा विध्वंस केला होता. जनविरोध असला तरी आयआरबी कंपनीने टोलआकारणी सुरू करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नासधूस झालेल्या टोल नाक्याच्या साफसफाईचे काम आयआरबी कंपनीने बुधवारी सुरू केले. त्याची सुरुवात फुलेवाडी टोल नाक्याजवळ झाली. झाडू घेऊन धूळ झटकण्याचे काम सुरू होते. या प्रक्रियेस टोलविरोधी कृती समितीने विरोध दर्शविला नाही. झाडलोट करण्याच्या कामास आमचा विरोध असण्याचे कारण नाही. तथापि टोलआकारणीचे फलक उभारणे, नाक्यांची नव्याने बांधणी करणे असा प्रकार झाल्यास तो उधळून लावण्यात येईल. टोल सुरू करण्यासाठी टेबल-खुच्र्याचा वापर केला जाणार असल्याची कुणकुण काल लागल्यावर प्रत्यक्ष टोलनाक्यांवर जाऊन त्याची पाहणी केली होती. त्यामुळे प्रत्यक्षात टोलआकारणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास त्यास विरोध केला जाईल. हसन मुश्रीफ व सतेज पाटील या दोन मंत्र्यांनी टोल सुरू होणार नाही असा विश्वास दिला असल्याने त्यांच्या शब्दांचा मान ठेवून तूर्तास आगळीक केली जाणार नाही, असे बाबा पार्टे यांनी सांगितले.
शिवसैनिकांना अटक
रविवारी झालेल्या टोल नाक्यांच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी बुधवारी २१ शिवसैनिकांना अटक केली. त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्वीय सहायक राहुल बंदोडे, दुर्गेश लिंग्रज, सुनील जाधव आदींचा समावेश आहे. यापूर्वी मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. पोलिसांनी महापौर सुनीता राऊत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह सुमारे १५००लोकांवर गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.