सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील टोलबाबतचा सोमवारच्या बठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. तथापि सोमवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत सुरू असणारी टोलवसुली बंद पाडली. दिवसभर टोल नाक्यापुढे धरणे आंदोलनही करण्यात आले.  राष्ट्रवादीने दोन दिवस थांबा व वाट पहा ही भूमिका घेतली असून, काँग्रेसने स्थानिक पातळीवर विरोध तर राजकीय पातळीवर चच्रेची भूमिका घेतली आहे. टोल नाका रद्द करण्यावरून सांगलीच्या कृष्णातीरी आता श्रेयवाद रंगू लागला आहे.
सांगलीवाडी येथे खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या पुलासाठी आकारण्यात येणा-या टोलवसुलीला सर्वपक्षीय विरोध करण्यात येत असून, टोल हटाव मोहिमेचा भाग म्हणून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी मुंबईत कृती समिती व शासकीय अधिका-यांची बठक बोलावली होती. या बठकीत टोल रद्द करण्याबाबत न्यायालयीन बाब समोर येत असल्याचे लक्षात येताच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे सचिव मुखर्जी यांनी दिले. या बठकीस पाटील यांच्यासह बांधकाममंत्री छगन भुजबळ, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, रविवारी रात्री पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी टोलवसुली बंद करण्यासाठी सर्वपक्षीय बठक बोलावली होती. या बठकीत पालकमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची तयारी दर्शविली. या बठकीस शासकीय अधिका-यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
टोल बंद करण्याबाबत मुंबईत बठक सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी आ. नितीन िशदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी टोल नाक्यावर मोडतोड करून टोलवसुली बंद पाडली. त्यानंतर नाक्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांसह उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, मदन पाटील युवा मंचाचे सतीश साकलकर, वाहतूकदार संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर पाटील आदी सहभागी झाले होते. धरणे आंदोलनास केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाठिंबा दर्शविला.