शीव-पनवेल महामार्गावरील खारघर आणि कामोठे येथील टोलनाक्यांनी कळंबोलीच्या लोखंड पोलाद बाजारातील वाहतूकदारांना जेरीस आणले आहे. टोलवसुली करणाऱ्या कंत्राटदाराने अचानक शासकीय अध्यादेशामधील शब्दांच्या नियमावर बोट ठेवून कळंबोलीतील लोखंड पोलाद बाजारातील वाहतूकदारांना मिळणारी पास सवलत बंद केल्याने या वाहतूकदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने खारघर टोलनाक्याच्या आरंभाला अध्यादेश काढून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना सवलत देण्याचे स्पष्ट केले होते. अध्यादेशाच्या आदेशाने टोलवसुली करणाऱ्या कंत्राटदाराने रोडपाली उड्डाणपुलाखाली एक चौकी बसवून तेथून तळोजा लिंकरोडवरून येणाऱ्या वाहनांना मोफत सवलतीचा पास देण्याचे काम मागील पाच महिन्यांपासून सुरू केले होते. अचानक टोलवसुली करणाऱ्या कंत्राटदाराने अध्यादेशामधील शब्दांच्या नियमावर बोट ठेवून रोडपाली उड्डाणपुलाखालील चौकी हलवून ही चौकी तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मुंब्रा-पनवेल मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या आरंभीला वसवली आहे. या नवीन चौकीमुळे लोखंड पोलाद बाजार, तळोजा गाव, तळोजा वसाहत, नावडे गाव, नावडे वसाहत आणि जवळपासच्या ग्रामीण परिसराला मिळणारी टोलसवलत बंद झाली आहे. देशातील सर्वाधिक मोठा लोखंडाचा व्यापार कळंबोली येथे होतो. येथील लोखंडाच्या दळणवळणासाठी जड व अवजड अशी सुमारे चार हजार वाहने येथे व्यवसाय करतात. असे असताना अचानकपणे सुरू करण्यात येणाऱ्या या टोलवसुलीमुळे पोलाद वाहतूकदारांवर अन्याय झाला आहे, असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे.  
मुळात कळंबोली येथील लोखंड बाजारातील वाहतूकदारांचा वाहतूक व्यवसाय ठप्प झाला असताना प्रति ट्रेलरसाठी २२० रुपये, ट्रकसाठी ११० रुपये व टेम्पोसाठी ८० रुपये येथे दिल्याशिवाय टोलनाक्यातून वाहने जाऊ दिली जात नाहीत. ३१ मेची चारचाकी वाहनांच्या टोलमुक्तीमध्ये विलंब झाल्यास नावडे व तळोजा परिसरातील चारचाकी वाहनांचा प्रश्न या चौकीच्या बदललेल्या जागेमुळे निर्माण होणार आहे. नावडे गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाराम पाटील, भाजपचे नेते लक्ष्मण पाटील, रोडपाली गावात आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड तसेच तळोजा गावाचे ग्रामस्थ आणि शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील हे या जनतेसाठी काय पवित्रा घेतात, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे.  

सरकारने खारघर टोलसाठी काढलेल्या अधिसूचनेत तळोजा औद्योगिक वसाहतीमधून येणारा मार्ग असा उल्लेख केला आहे. त्यामुळे खारघर व कामोठे टोलनाक्याकडे जाणारा मार्ग तळोजा लिंकरोड हा एकमेव आहे. त्यामुळे ही सवलत एमआयडीसीतील वाहनांसोबत कळंबोली लोखंड बाजारातील चार हजार जड व अवजड वाहनांना मिळालीच पाहिजे. पाच महिन्यांपूर्वीपासून ही सवलत आम्हाला टोलवसूल करणाऱ्या कंपनीने दिली आहे. हा नवीन सुचलेला शहानपणा आम्हा वाहतूकदारांना त्रासदायक ठरणारा आहे. या गंभीर प्रश्नी आम्ही टोल पर्यवेक्षकांशी चर्चा केली आहे. त्यांनी या प्रश्नी कंपनीशी बोलून एका आठवडय़ात उत्तर देतो असे आश्वासन दिले आहे. सध्या आमच्या वाहतूकदारांकडून खारघर व कामोठे टोलवसुली सुरूच आहे. आम्ही येथेच राहणारे आहोत, त्यामुळे आम्ही सरकारच्या स्थानिक व्याख्येत का येत नाही, हेसुद्धा सरकारने स्पष्ट केले पाहिजे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे हा प्रश्न मांडणार आहोत. तरीही प्रश्न न सुटल्यास आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.
    -रामदास शेवाळे, अध्यक्ष,
    तळोजा-कळंबोली वाहतूकदार संघटना