शहरातील मेळा, ठक्कर बाजार आणि महामार्ग या बस स्थानकांच्या आवारातील प्रसाधनगृहात ठेकेदाराचे कर्मचारी लघुशंकेसाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून दांडगाईने सक्तीची वसुली करीत असून पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्यास सांगण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महत्वाची बाब म्हणजे पुरुषांबरोबर महिलांकडूनही सक्तीने वसुली केली जाते. त्या संदर्भात चौकशी केली असता हे ‘स्थानक बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर दिले असून त्याचा ठेका आर. सी. ग्रुपला मिळाल्याचा दावा संबंधित मुजोर कर्मचाऱ्यांनी केला. एसटी महामंडळाच्या अखत्यारीतील जागेत खुलेआम ही लूट सुरू असताना आगारातील अधिकाऱ्यांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. असाच प्रकार महामार्ग, ठक्कर बाजार बसस्थानकावरही सुरू असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
मेळा बस स्थानकातून त्र्यंबकसह ओझरसाठी बसेस सोडल्या जात असल्या तरी बाहेरगावाहून येणाऱ्या बहुतांश बसेस या स्थानकावर प्रवाशांना उतरवितात. त्यामुळे दिवसभरात या ठिकाणी प्रवाशांची चांगलीच गर्दी असते. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी संपूर्ण देशातून येणाऱ्या भाविकांना मेळा स्थानकातून पुढे जावे लागते. ओझर येथे विमान कारखाना असल्याने या ठिकाणी देशाच्या विविध भागातील कर्मचाऱ्यांचा रहिवास आहे. त्यांनाही बसने ओझरला जाण्यासाठी मेळा स्थानकातच यावे लागते. त्यामुळे नाशिकची प्रथमदर्शनी ओळख करून देणारे हे स्थानक सर्वच बाबतीत आदर्श ठेवावयास हवे. परंतु नेमकी याउलट स्थिती दिसते. अतिशय अस्वच्छ आणि जुनाट प्रसाधन गृहात येणाऱ्या प्रवाशांची सरसकट लूट केली जात आहे. शहरातील काही बस स्थानकांवर प्रसाधन गृहांचा ठेका एसटी महामंडळाने खासगी संस्थांना दिला आहे. त्या ठिकाणी ठेकेदार संस्था प्रसाधन गृह व शौचालयांची स्वच्छता राखते. परंतु, प्रसाधन गृहात जाणाऱ्यांकडून कोणतीही रक्कम आकारली जात नाही. पैसे आकारले जातात ते केवळ शौचालयात जाण्यासाठी. मात्र, मेळा स्थानकात शौचालयासह प्रसाधनगृहात जाण्यासाठी प्रवाशांकडून एक-दोन रुपये आकारले जातात. तीन ते चार टवाळखोर या ठिकाणी बसलेले असतात. कोणी सक्तीच्या वसुलीबद्दल विचारणा केल्यास त्याला दमदाटी केली जाते. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांकडून प्रसाधनगृहाची स्वच्छता करुन घेतली जाते, असे संबंधितांकडून प्रवाशांना बजावले जाते.
एसटी बसने संगमनेरहून नाशिकला आलेल्या मनोज कापडे यांना प्रसाधन गृहातील मुजोर कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागला. लघुशंकेसाठी आलेल्या प्रवाशांकडून या ठिकाणी खुलेआम पैशांची वसुली केली जात होती. कापडे यांनी नियमावली दाखविण्याची मागणी केली असता संबंधितांनी त्यास नकार दिला. पैसे द्यावेच लागतील अन्यथा प्रसाधनगृह साफ करावे हा येथील नियम असल्याचे संबंधित टारगट कर्मचाऱ्यांनी सांगितले. नियमावली वगैरे काही नाही. इथे सर्व तोंडी नियम चालतात. तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या आणि पैसे द्या असे दरडावत संबधितांनी कापडे यांच्यावर दबावतंत्राचा अवलंब केला. या एकूणच प्रकाराविषयी त्यांनी एसटी महामंडळाकडे लेखी तक्रारही केली आहे.एसटी महामंडळाच्या जागेत सुरू असलेल्या खुलेआम लुटमारीविषयी विचारणा करणाऱ्या नागरिकाला धमकावले जाते.
या घटनाक्रमामुळे महामंडळाच्या आवारात प्रवाशी असुरक्षित असल्याचे दिसत आहे. या पध्दतीने ज्या ज्या स्थानकांमध्ये लूट केली जाते, ती त्वरित रोखण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत, अशी मागणी कापडे यांनी केली आहे.
‘आर. सी. ग्रुपला ठेका’
मेळा बस स्थानक ‘बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर बांधण्याचा आर. सी. ग्रुप या कंपनीने ठेका घेतला आहे. या कंपनीचे कार्यालय द्वारका येथे आहे. या कंपनीद्वारे प्रसाधनगृहात ही वसुली केली जात आहे. पैसे दिल्याशिवाय लघुशंकेसाठी कोणालाही जाता येणार नाही. या ठिकाणी दिव्यांची सुविधा नसते. आम्ही मेणबत्ती लावून प्रवाशांची सोय करतो. पाणी आमचे आहे. त्याद्वारे स्वच्छता करतो. यामुळे पैसे दिल्याशिवाय लघुशंकेसाटी कोणालाही जाता येणार नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाची सनद
एसटी महामंडळाची सनद लक्षात घेता बस स्थानकातील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी पैसे घेतले जात नाहीत. महिलांसाठी आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी शौचालयाची सुविधाही मोफत असते. परंतु, नाशिक शहरातील बस स्थानकांवर ही सनद खुंटीला टांगून सर्रास प्रवाशांची लुबाडणूक केली जात आहे.
मेळा स्थानकातील प्रसाधनगृह अनधिकृत
एसटी महामंडळाच्या मेळा स्थानकातील संबंधित प्रसाधनगृह अनधिकृत असून ते हटविण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाणार आहे. प्रसाधनगृहात प्रवाशांना केली जाणारी दमदाटी धोक्याची बाब आहे. तसेच शहरातील इतर आगारातील प्रसाधनगृहाचा ठेका ‘सुलभ’ला देण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोणी लघुशंकेला जाणाऱ्यांकडून पैसे आकारत असल्यास प्रवाशांनी तक्रार करावी. संबंधितांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले यांनी सांगितले.