वाहनधारकांशी अरेरावी, वाहनचालकांना मारहाण, लोकप्रतिनिधींशी वाद आदी कारणांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर मुजोर सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी एका बस चालकाला मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ टोलनाक्यावर जमलेल्या चालकांनी सर्व बसेस टोल नाक्यावर उभ्या करत आंदोलन केले. तासभराच्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
पिंपळगाव बसवंत येथे महिला कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापन होणारा हा टोलनाका वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतो.
शुक्रवारी पुन्हा तो सुरक्षारक्षकांच्या मुजोरीमुळे चर्चेत आला. नाशिक आगारातील नाशिक-धुळे बस शुक्रवारी सकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आली. चालकाने बस थांबवून टोलपास पंच केला आणि पुढे घेतली. मात्र टोल नाक्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांना दांडा आडवा लावून बस थांबविण्यास भाग पाडले. अचानक ब्रेक दाबल्यामुळे प्रवाशीही घाबरून गेले. चालक दत्तात्रय देवरे यांनी पास पंच केल्याचे सांगत बस जाऊ देण्याची विनंती केली. मात्र काहीही न ऐकता चार-पाच सुरक्षा रक्षकांनी देवरे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. प्रवाशांनी मध्यस्थी करत देवरे यांची सुटका केली. दरम्यान, रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या इतर बस चालकांनी हा प्रकार पाहिला. आणि टोल नाक्यावर मधोमध आपल्या बसेस उभ्या करत आंदोलनाचा पवित्रा घेतला.
या टोल नाक्यावर नेहमीच सुरक्षा रक्षक तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अरेरावीचा सामना करावा लागत असल्याने बस चालकांनी आंदोलन सुरू केले. जवळपास तासभर बसेस या ठिकाणी उभ्या असल्याने दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी धाव घेतली. बस चालकांची समजुत काढत मुजोर सुरक्षा रक्षकांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी, प्रवासी व अन्य वाहनधारकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. देवरे यांच्या तक्रारीवरुन टोल नाक्यावरील दोन सुरक्षा रक्षकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कठोर कारवाई करावी
बसचा टोलपास पंच करूनही बस अडविण्यात आली. विनाकारण शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. वाहनधारकांना विनाकारण त्रास देणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
– दत्तात्रय देवरे (बसचालक)