सायन- पनवेल मार्गावरील खारघर व कामोठे टोलनाक्यातून पनवेलच्या स्थानिक वाहनांना सवलत मिळविण्यासाठी एसपीटीपीएल कंपनीने रोडपाली उड्डाणपुलाखाली एक खिडकी योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन केंद्र उभारले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार लाभार्थी वाहनचालकांना या एक खिडकी योजनेत आपल्या वाहनांच्या नोंदणीच्या कागदपत्रांची पूर्तता केल्याबरोबर केंद्रातून कंत्राटदार कंपनीच्या नावाचा (टॅग) बारकोड असलेला स्टिकर देण्याची सोय येथे करण्यात आली आहे. मात्र हा स्टिकर मोफत नसून यासाठी १५० रुपये मोजावे लागणार आहेत. यानंतर खऱ्या अर्थाने टोलवसुलीतून स्थानिक खासगी वाहनांची मुक्तता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसूचनेनुसार पनवेल शहरासहित खांदेश्वर व नवीन पनवेल वसाहतींमधील वाहनमालकांच्या खासगी वाहनांना खारघर टोलमधून सवलत मिळाल्याचे या केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. टॅग देण्याचे काम मंगळवारी सकाळपासून सुरू झाले आहे. येथे दहा कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत येथे सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी पनवेल तालुक्यातील गावे असा उल्लेख असल्यामुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. मात्र पनवेलमधील सिडकोच्या पाचही वसाहतींचा समावेश या टोलसवलतीमध्ये करण्यात आला आहे. ही सवलत व्यावसायिक वाहनांना नसून खासगी वाहनांना असणार आहे. रोडपाली उड्डाणपुलाखाली मंगळवारपासून टॅग घेण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आंदोलनामुळे पनवेलच्या स्थानिक वाहनचालकांना ही टोलसवलत मिळाल्याने या मार्गाचा सर्रास उपयोग करणाऱ्या पनवेलच्या स्थानिक वाहनचालकांच्या खिशावर रोज पडणाऱ्या ६० रुपयांच्या टोलधाडीतून किमान पनवेलचे काही स्थानिक वाहनचालक बचावले आहेत. आमदार ठाकूर यांनी, संपूर्ण पनवेल तालुक्यामधील वाहनचालकांच्या टोलसवलतीची मागणी लावून धरणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार टोलवसुलीच्या परिक्षेत्रातील ५ किलोमीटर अंतरावरील गावांना सूट देण्याऐवजी ही अट शिथिल करत १० किलोमीटर अंतरावरील गावांना टोलसवलत मिळावी म्हणून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोडपाली उड्डाणपुलाखाली हे टॅग मिळणार आहे. यासाठी पनवेलच्या वाहनचालकांना दीडशे रुपये खर्च करावा लागणार आहे. ज्यांच्या मालकीचे खासगी वाहन आहे, त्या वाहनाचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणी बुक (आर.सी. बुक) व त्याची एक प्रत झेरॉक्स तसेच संबंधित व्यक्तीच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, विजेचे बिल, फोन बिल, बँकेचे पासबुक, मतदार ओळखपत्र यापैकी एक मूळ प्रत दाखविण्यासाठी व एक प्रत झेरॉक्स सादर करावी लागणार आहे. एसपीटीपीएल कंपनीने टॅग देण्यासाठी सुरू केलेली एक खिडकी योजना सिडको वसाहत व पनवेल शहरात सुरू केल्यास लाभार्थी वाहनचालकांना सोयीचे होईल अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.