‘टुमॉरो 8 पीएम’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखे कॅम्पेन राबवले जात आहे. या चित्रपटाचे तरुण निर्माते, दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन २९ राज्यांमधून रोड ट्रीपचे आयोजन के ले आहे. ‘टुमॉरो 8 पीएम’ या चित्रपटाची कथा सर्वसामान्यांचे रोजचे जगणे आणि काळ, काम, सेकंदांशी त्यांनी जमवलेले गणित यांभोवती फिरणारी आहे. त्यामुळे देशभरातील लोकांचा अनुभव, त्यांची मते जाणून घेऊन त्यावर चित्रपटाची पटकथा बेतण्याची योजना आखण्यात आली असल्याचे चित्रपटाचे निर्माते प्रकाश सरोदे यांनी सांगितले.
सध्या हिंदी चित्रपटांकडे पाहिले तर मल्टिप्लेक्सचा सिनेमा हा प्रेक्षकांनी नाकारला आहे. त्याचे कारण या चित्रपटांना पटकथाच नसते. याउलट, ज्या पटकथांवर काम क रून छोटे-मोठे चित्रपट उभे राहतात, त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही जेव्हा चित्रपटनिर्मितीकडे वळायचे ठरवले तेव्हाच या रुळलेल्या वाटेपेक्षा वेगळे काही तरी करायचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रकाश सरोदे यांनी दिली. ‘म्युज मूव्हीज’ या बॅनरखाली ‘टुमॉरो 8 पीएम’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आपण वेळेला फारसे महत्त्व देत नाही. वेळ ही खूप महत्त्वाची असते. तुमच्या जगण्यातला प्रत्येक सेकंद तुम्हाला काही तरी देत असतो. आपल्यापैकी प्रत्येकाने जरी वेळ, आपली जीवनशैली आणि पैसा हे समीकरण नीट समजून घेतले तर देशभरात एक मोठी ताकद निर्माण होऊ शकेल, या विचारसूत्राभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे, असे दिग्दर्शक मनोज मौर्या यांनी सांगितले.
चित्रपटाची संकल्पनाच तशी अनोखी असल्याने आपापल्यापुरते हे विचार मर्यादित न ठेवता लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे या रोड ट्रीपचे आयोजन करण्यात आले असल्याचे सरोदे यांनी सांगितले. त्यानुसार, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रोड ट्रीपचा शुभारंभ करण्यात आला आहे. या रोड ट्रीपचा पहिला टप्पा गुजरातमध्ये आहे. गुजरातपासून पुढे एकूण १७,००० किमीचा प्रवास या चित्रपटाची टीम करणार आहे. २९ राज्यांमधून फिरताना तेथील लोकांना त्यांची जीवनशैली, त्यांच्या दृष्टीने वेळेचे महत्त्व यावर बोलते केले जाणार आहे. गेल्या पाच महिन्यांत आम्ही या संकल्पनेवर काम करत होतो. पुढच्या तीन महिन्यांत आमची रोड ट्रीप पूर्ण होईल. एवढय़ा मोठय़ा प्रवासातून जर ५ हजार लोकांशी आम्ही संवाद साधला असेल तर त्यांच्या अनुभवांमधून एक विचारांची दिशा आम्हाला नक्की मिळेल. आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक याबद्दल काय विचार करतात हे जाणून घेऊन त्यावरून पटकथा तयार करणार असल्याचे सरोदे यांनी सांगितले. अशाप्रकारे, पहिल्यांदाच लोकांच्या अनुभवातून चित्रपटाची पटकथा तयार केली जाणार आहे, असा दावा या चित्रपटाच्या टीमने केला आहे.