जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर काँग्रेसचे काम वाढायला हवे. पक्ष का वाढत नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पक्ष वाढत नसेल तर पदे अडवून ठेवू नका, असे वक्तव्य आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी शनिवारी जिल्हा काँग्रेस बठकीत केले. यावर आपण सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ आहोत. कोणीही नंतर यावे आणि आम्हाला पक्षनिष्ठा शिकवावी, हा प्रकार चुकीचा आहे. ‘ना घर का ना घाट का?’ अशी भूमिका आमची कधीही नव्हती, आम्ही खानदानी आहोत, अशा शब्दात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
येथील काँग्रेस भवनात शनिवारी जिल्हा काँग्रेसची बठक राज्यमंत्री तथा पक्षाचे संपर्कमंत्री राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत पार पडली. माजी खासदार तुकाराम रेंगे, प्रा. टी. पी. मुंढे, माजी आमदार कुंडलिक नागरे, मेघना बोर्डीकर, आनंद भरोसे, बाळासाहेब देशमुख, बंडू पाचिलग, भावना नखाते, डॉ. विवेक नावंदर, राजेश देशमुख आदी उपस्थित होते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही बठक आयोजित केली होती. माजी खासदार रेंगे यांनी आपला क्रमांक एकचा शत्रू शिवसेना आहे हे विसरू नका, असे सांगितले. लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडून सोडवून घ्यायची असेल तर राष्ट्रवादीला क्रमांक एकचा शत्रू मानता येणार नाही. शिवसेनेला कधी काँग्रेसने तर कधी राष्ट्रवादीने छुपी मदत केल्यामुळेच ती जिवंत आहे, असेही रेंगे म्हणाले.
आमदार बोर्डीकर यांनीही राष्ट्रवादी हाच आपला क्रमांक एकचा शत्रू आहे, असे सांगितले. गेल्या निवडणुकीत रेंगे यांचा पराभव का झाला? संघटनात्मक बाबतीत आपण का कमी पडत आहोत? कामाला न्याय द्यायचा नसेल तर पदे कशासाठी अडवून ठेवता, असा प्रश्न भाषणात उपस्थित केला. मेघना बोर्डीकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहोत, असे म्हटले. निवडणुका जवळ आल्यानंतर अनेकांना आमदार, खासदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. पक्षासाठी वेळ न देणाऱ्यांनाही निवडणुका लढविण्याची घाई झाली आहे. आपण इच्छुक आहोत, ताकाला जाऊन भांडे लपवणार नाही, असे त्या म्हणाल्या.
गफार मास्टर यांनी नागरे केवळ पोस्टरछाप नेता आहेत, अशी टीका केली. केवळ पोस्टर छापल्याने कोणी पक्षकार्य करूशकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. आधीच्या सर्व भाषणांचा जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी समाचार  घेतला. जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सर्वाच्याच भावनांचा विचार करावा लागतो. मात्र, काही प्रतिकूल घडले तर त्याचे खापर लगेच आमच्या माथी फोडले जाते. कधी चुकले तर तुम्ही हक्काने सांगू शकता, अशी विधाने देशमुख यांनी केली. मात्र, त्यांचा रोख कोणावर, हे उपस्थित कार्यकर्त्यांनाही कळून चुकले.
राज्यमंत्री गावीत यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजे. सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक मजबुतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.