सार्वजनिक उत्सवानिमित्त शहरांमध्ये ठिकठिकाणी लागणाऱ्या ध्वनिवर्धकांमुळे होणारे प्रदूषण मुलांसाठी घातकच ठरते, असा निर्वाळा ठाण्यातील बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे. ध्वनिवर्धकांचा आधुनिक अवतार असणारे डीजे आता सार्वजनिक उत्सवांचा अविभाज्य घटक ठरू लागले असून त्यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर या अतिरेकी आवाजाचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होतात, असे मत ठाण्यातील बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप केळकर यांनी व्यक्त केले आहे.
ऐंशीपेक्षा अधिक डेसिबल्सच्या आवाजाच्या संपर्कात मुले अधिक काळ असतील, तर त्यांची श्रवणक्षमता धोक्यात येऊ शकते. अगदी मातेच्या पोटात गर्भावस्थेत असतानाही मुले ध्वनीला प्रतिसाद देत असतात. तेव्हापासून ध्वनीचे आरोग्यावर परिणाम होत असतात. केवळ श्रवणक्षमताच नव्हे तर अतिरेकी आवाजामुळे मुलांच्या एकूण निकोप वाढीत बाधा येते. त्यांची एकाग्रता तसेच ग्रहणक्षमतेवर त्याचा परिमाण होतो. निद्रानाश बळावतो. मुलांमध्ये वर्तन समस्या निर्माण होते. ते चिडचिड करू लागतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. क्षुल्लक कारणांवरून वाद घालण्याची प्रवृत्ती बळावते. शारीरिक वाढ खुंटते. तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा दूरगामी परिणाम होतो, असेही डॉ. केळकर यांनी सांगितले.
श्रवणदोष चाचणीची सोय
मूल जन्माला आल्यानंतर ते शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सुदृढ आहे की नाही, हे पाहण्यासाठी सर्व चाचण्या होतात, फक्त श्रवणदोष चाचणी होत नाही. श्रवणदोष जर वेळीच लक्षात आला तर तो दूर करून संभाव्य मूकबधिरपण टाळता येते. त्यामुळे ठाणे बालरोगतज्ज्ञ संघटनेने शहरात मुलांसाठी अत्याधुनिक पद्धतीने श्रवणदोष चाचणी उपलब्ध करून दिली आहे.
देशभरात अशा प्रकारची चाचणी केवळ केरळमध्येच होत होती. आता बालरोगतज्ज्ञ संघटनेने ती सोय ठाण्यात उपलब्ध करून दिली आहे.