रेल्वेत नियमित गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी अशा ‘टॉप टेन’ गुन्हेगारांची यादी बनवली असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.
रेल्वेत प्रवास करताना प्रवाशांचा जीव नेहमी टांगणीला असतो. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचा रेल्वे परिसरात वावर असतो. चोरी, लूटमार, हल्ला करून दुखापत करणे आदी गुन्हे हे टोळीवाले करत असतात. रेल्वे पोलीस त्यांना अटक करतात. मात्र नंतर ते जामिनावर सुटून पुन्हा सक्रीय होतात. हे भुरटे चोर एवढे निर्ढावलेले असतात की ज्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा होते तोच गुन्हा ते पुन्हा सुटल्यावर करत राहतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या कारवाया रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे.
रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेने अशा गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार त्यांनी ‘टॉप १०’ अट्टल गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू आहे. यापैकी तीन गुन्हेगारांना यापूर्वीच विविध गंभीर गुन्ह्यांची कलमे लावून पुन्हा अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित सात जणांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वडमारे यांनी दिली.
यासंदर्भात वडमारे म्हणाले की, हे गुन्हेगार अट्टल आणि सराईत असतात. कायद्याच्या त्रुटीचा त्यांना अभ्यास असतो. त्यामुळे ते बिनधास्तपणे गुन्हे करत असतात. पकडले गेल्यावर काय कलमं लागतील याचीही त्यांना माहिती असते आणि त्याप्रमाणे सुटल्यावर ते सक्रीय होतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केल्यास रेल्वेचे गुन्हे कमी होतील, अशी रेल्वेला आशा आहे. हे गुन्हेगार एका टोळीतून दुसऱ्या टोळीत काम करत असतात. त्यातील हे दहा मुख्य गुन्हेगारांना दीर्घकाळासाठी तुरुंगात पाठवले तरी इतर भुरटय़ा चोरांना आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.