जो समाज पूर्वापारपासून योनिशुचितेसाठी आग्रही आहे, तो समाजच महिलांवरील अत्याचाराला कारणीभूत आहे, असे परखड मत प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट यांनी व्यक्त केले.
‘रामनारायण रुईया महाविद्यालया’तर्फे गुरुवारी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘आम्ही स्त्रिया, आमची सुरक्षितता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील ज्वलंत विषयावर समाजमन विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. रवी बापट, अभिनेत्री- दिग्दíशका स्मिता तळवलकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे आणि पोलीस उपायुक्त शारदा राऊत, एच. के. वराईच हे मान्यवर सहभागी झाले होते. डॉ. रवी बापट यांनी स्त्री-पुरुष लंगिकतेच्या फरकाचे शास्त्रीय विवेचन केले.
या वेळी बोलताना कुबेर म्हणाले की, भारतीय समाजातील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर नियमबाह्य़ वर्तनामध्ये धाडसाची फुशारकी मारणे आणि त्याला प्रतिष्ठा देणे आपण थांबवायला पाहिजे. स्मिता तळवलकर यांनी नाटक-चित्रपटातील स्त्री चित्रणाबद्दल आपली मते मांडली आणि समाजाच्या विशेषत: पुरुषांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनावर प्रकाशही टाकला. आधुनिक युगात स्त्रियांनी स्वत:च्या रक्षणाची सिद्धता करावी आणि लढाऊपणे आपल्यावरील संकटांचा सामना करावा, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केले. पोलीस उपायुक्त राऊत आणि वराईच यांनी पोलीस यंत्रणा, बलात्कारासारखे गुन्हे आणि सामाजिक वर्तन याचा वेध घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी प्रास्ताविकात हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली.