राधानगरी तालुक्यातील मुले विक्रीच्या घटनेत आज आणखी १९ मुलांची विक्री झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे विक्री झालेल्या मुलांचा अकडा ३० वर गेला आहे. दरम्यान मुलांची विक्रीची कारणे, त्यातील सहभागी व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे मात्र दुसऱ्यादिवशीपर्यंत याबाबत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. विक्री करण्यात आलेल्या या सर्व मुलांची सध्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
राधानगरी धरणापासून जवळच असलेल्या भांबरभैरी या पाडय़ात राहणाऱ्या कातकरी समाजाची मुले २ ते २० हजार रुपयांना विकली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीस तीन मुले विकल्याचे समजले होते. दुसऱ्या दिवशी हा आकडा ८ पर्यंत पोहोचला. तर गुरुवारी आणखी १९ मुले विकल्याचे समजल्याने जिल्हा प्रशासनाला धक्का बसला. आज याबाबत तपास यंत्रणेने वेग घेतला आहे.
हा प्रकार घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन संबंधित बालके व कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीस तहसीलदार रणजित देसाई, सहाय्यक कामगार आयुक्त बी.डी.गुजर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयाची माहिती देताना प्रांत शिंगटे म्हणाले, सर्व ३० बालकांची शुक्रवारी वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्यांची मोफत निवास व शिक्षणाची सोय केली जाणार आहे. आदिवासी विभागाकडून कातकरी समाजातील या लोकांना आदिवासींचे दाखले मिळाल्यानंतर पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. ११ पैकी पाच कुटुंबांना घरकुले बांधून देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाणार आहे. त्यांचा पाणीप्रश्न तुर्तास राष्ट्रीय पेयजल योजनेतून पूर्ण केला जाणार असून एप्रिलमध्ये कायमस्वरूपी पाणीयोजना राबविली जाणार आहे.
दरम्यान गुरुवारी राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयात पकडण्यात आलेल्या बालकांच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कातकरी समाजातील मुले विकल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर गुरुवारी आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी  संपर्क साधून त्यांच्या पुनर्वसनासाठी तत्परतेने हालचाली करणार असल्याचे सांगितले. दरम्यान ही घटना उघड होऊन दोन दिवस झाले तरी याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून कारवाईबाबत प्रशासकीय पातळीवर गोंधळाचे वातावरण आहे. या मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.