प्लंबिंग असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट (आयआयए) यांच्या वतीने प्लंबिंग विषयावर कार्यशाळा आणि अभ्यास दौरे केल्यास प्लंबिंगच्या कामात सुधारणा होऊ शकेल, असे मत नाशिक प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवि पाटील यांनी व्यक्त केले. आयआयए स्थानिक केंद्राचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पाटील यांनी संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व कार्यशाळांची माहिती दिली. चव्हाण यांनी केंद्राची नवीन कार्यकारिणी लवकरच ‘प्लंबिंग नॉलेज सेंटर’ला भेट देईल, असे सांगितले. ‘फायर प्लंबिंग’ विषयावर कार्यशाळा घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. शशिकांत पाटील यांनी जळगाव येथील प्लंबिंग नॉलेज सेंटर व प्लंबिंग लॅबची माहिती दिली. काचेच्या पारदर्शक पाइपचा वापर करून प्लंबिंग लॅबची उभारणी करण्यात आली आहे. प्लंबिंगमधील हायड्रॉलिक नियम पुस्तकापेक्षा प्रात्यक्षिकातून लवकर शिकता येते, असेही त्यांनी सांगितले. श्रीहरी गांगल यांनी प्लंबिंग नेमण्याची काय गरज आहे, प्लंबिंग कन्सल्टंट कोण, त्याचे शिक्षण व ज्ञान, त्याच्या जबाबदाऱ्या व त्याची कर्तव्ये यांची माहिती दिली. यावेळी आयआयएचे प्रदिप काळे, दीप भागवत, प्लंबिंग संघटनेचे संजय नंदाळे, सोमनाथ क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.