05 July 2020

News Flash

येऊरचा फेरफटका महाग

ठाणे शहरापासून अत्यंत जवळचे नैसर्गिक पर्यटन स्थळ असलेल्या येऊरच्या जंगलात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता जरा जास्त कात्री लागणार आहे.

| January 30, 2015 01:28 am

ठाणे शहरापासून अत्यंत जवळचे नैसर्गिक पर्यटन स्थळ असलेल्या येऊरच्या जंगलात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला आता जरा जास्त कात्री लागणार आहे. काल-परवापर्यंत कागदावरच असलेल्या येऊरच्या पर्यटन शुल्काची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून या शुल्कातही दहा टक्क्यांची वाढ केली आहे. तसेच दररोज सकाळी फिरण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांना वार्षिक पाससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या येऊर परिसराला विस्तीर्ण असे जंगल लाभलेले आहे. स्थानिक परिसरातील नागरिक दररोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायामासाठी येत असतात. त्यातच येऊरमध्ये अलीकडच्या काळात वाढलेले बंगले, फार्म हाऊस आणि हॉटेल्स यांच्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची वर्दळही येथे होत असते. या पाश्र्वभूमीवर या ठिकाणी पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय वनविभागाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, पर्यटकांकडून घातली जाणारी हुज्जत, स्थानिकांचा विरोध अशा कारणांमुळे याची अंमलबजावणी क्वचितच होत होती. मात्र, आता वनविभागाने सक्तीने पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. शिवाय, पर्यटन शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.
वनविभागाने शुल्क लागू केल्यामुळे ‘मॉर्निग वॉक’करिता जाणाऱ्या नागरिकांना पैसे मोजावे लागत होते. याला विरोध झाल्यामुळे वार्षिक पास योजना सुरू करण्यात आली. या वार्षिक पासच्या दरांतही आता दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
नीलेश पानमंद, ठाणे

असे असतील नवे दर
’जुन्या दरपत्रकात प्रौढांसाठी ३६ रुपये, ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी १९ रुपये आकारण्यात येत होते. हे दर आता अनुक्रमे ४० व २१ रुपये करण्यात आले आहेत.
’मोटारसायकल आणि रिक्षासाठी आता ३४ रुपये आकारण्यात येत आहेत. कार व जीपसाठी १३३ रुपये आणि ट्रक व बसकरिता २०० रुपये असे दर लागू करण्यात आले आहेत.
’वार्षिक पास योजनेत ज्येष्ठ नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी १५ रुपये, इतर नागरिकांच्या प्रभातफेरीसाठी १३३ रुपये आकारण्यात येतील. तर इतर नागरिकांना मासिक पास योजनेसाठी ३४ रुपये आकारण्यात आले आहेत.

अंमलबजावणी होणारच
येऊरमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारण्याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून काटेकोरपणे करण्यात येत आहे. यावरून काही पर्यटकांकडून अजूनही वनकर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार होत आहेत. मात्र, त्यांची समजूत काढून त्यांच्याकडूनही शुल्क वसूल केले जात आहे.
– सुशांत साळगावकर, येऊर वनक्षेत्र अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 1:28 am

Web Title: tourism fee of yeoor forest increases by of ten percent
Next Stories
1 शाळांच्या सहलीसाठी ट्रॅव्हल कंपन्या सरकारी शाळांना मात्र एसटीचीच सक्ती
2 वाहनतळाच्या जागी किराणा दुकान
3 विकेण्ड विरंगुळा
Just Now!
X