मराठवाडय़ासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत १ अब्ज ५८ कोटी ७५ लाख रुपये देण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने कळविण्यात आली. दरम्यान, रेल्वेच्या रडारवर औरंगाबादची उपेक्षा सुरूच असल्याचेही या माहितीवरून पुन्हा समोर आले आहे.
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी माहितीच्या अधिकारात या बाबत विचारणा केली होती. त्याला पाठविलेल्या उत्तरात सरकारने वरील माहिती कळविली आहे. वरील मंजूर रेल्वेमार्गासाठी रेल्वे बोर्डाकडे किती निधी मागण्यात आला व किती निधी देण्यात आला, याची माहिती वर्मा यांनी विचारली होती. या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के सहभाग दिला असून, रेल्वे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. रेल्वे प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्राकडून राज्याकडे मागितला जातो. राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत नाही. प्रकल्पाच्या सुधारित अंदाजित खर्चाला मान्यता देण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, पर्यटनाची राजधानी रेल्वेच्या नकाशावर उपेक्षितच असल्याचे चित्रही समोर आले आहे. सोलापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद-जळगाव या मार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता देण्यात आली असून, ३१ अब्ज ५१ कोटी ११ लाख रुपये अंदाजित किंमत असलेला सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाला गेल्या वर्षी २९ ऑगस्टला सादर करण्यात आला आहे. या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतिपथावर असताना अचानक या मार्गात बदल करून सोलापूर-गेवराई-शहागड-जालना-भोकरदन-सिल्लोड-अजिंठा-जळगावमार्गे रेल्वे नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन मार्गाची मागणी व त्यास मान्यता दिल्याच्या अहवालाची प्रत मिळावी, अशी विनंती वर्मा यांनी माहितीच्या अधिकारात केली होती.