नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी शुल्क आकारणी सुरू करताना वन विभागाने व्यापक प्रसिद्धी केल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असली तरी त्याचा विपरित परिणाम पक्षी जीवन धोक्यात होण्यात होईल, अशी भिती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. कारण, पर्यटकांच्या गर्दीमुळे पक्ष्यांच्या अधिवासाजवळ बोटींग करणे, दगड मारणे, आरोळ्या ठोकणे, पानथळ जागेत उतरून फुले तोडणे, असे प्रकार सर्रास घडत असल्याची तक्रार त्यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अभयारण्यातील पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता तातडीने उपाय योजण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनाने १९८६ मध्ये नांदुरमध्यमेश्वर हे पक्षी अभयारण्य म्हणून जाहीर केले आहे. मागील २६ वर्षांत कधी नव्हे असे संकट पक्ष्यांवर आले आहे. त्यास मुख्य कारण, वन विभागाने शुल्क आकारणी करताना केलेल्या प्रसिद्धीत आहे.
या निर्णयामुळे वन विभागाला किरकोळ उत्पन्न मिळणार असले तरी पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत परिसरात मोठय़ा प्रमाणात निसर्ग हानी होण्याचे संकेत मिळत असल्याचे शेखर गायकवाड, डॉ. श्याम पाटील व प्रशांत भामरे यांनी म्हटले आहे.
अभयारण्यास भेट दिली असता असे अनेक प्रकार पहावयास मिळाले की, ते पक्ष्यांच्या जीवनावर परिणाम करू शकतात.
वन विभागाने प्रथम पक्षीजीवन महत्वाचे की पर्यटक याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे हे अभयारण्य हवे की पर्यटनस्थळ याचा निर्णय घेण्याची ही वेळ आहे. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाण्यात बोटींग सुरू आहे. फ्लेमिंगोचा अधिवास बोटींगमुळे नष्ट होऊ शकतो. हे बोटींग त्वरीत बंद करण्याची आवश्यकता आहे. मनोरा क्रमांक तीन हा थेट फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांच्या अधिवासाजवळ आहे. हा मनोरा कायमस्वरूपी बंद करण्याची गरज आहे. कारण, या मनोऱ्याजवळ जाऊन पर्यटक दगडे मारतात. आरोळ्या ठोकतात. या ठिकाणी मद्यसेवनाचेही प्रकार होतात. पानथळ जागेत उतरून कमळ व इतर फुलेही तोडली जातात. या ठिकाणी होणारा मांसाहार त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सध्याच्या मुख्य सिमेंट गॅलरीजवळ केवळ पक्षी निरीक्षकांना प्रवेश देण्यात यावा. या गॅलरीभोवती प्रवेशद्वारापासून भक्कम तारेचे कुंपण करावे, पक्षी निरीक्षकांना तसेच अभ्यासकांना या भागात मर्यादित अंतरावर प्रवेश मिळावा, पर्यटकांची संख्या वारेमाप वाढून फ्लेमिंगोचे जीवन धोक्यात येणार नाही, याची काळजी वन खात्याने घ्यावी अन्यथा अभयारण्यात पक्षी दिसणार नाही, असा इशारा पक्षीप्रेमींनी दिला आहे.