कान्हा व्याघ्रप्रकल्पाकडे भारतीय व विदेशी पर्यटकांचा ओढा ओसरला असल्याचे गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यावर्षी पर्यटकांच्या संख्येत किंचित वाढ झाली असली तरी ती फारशी समाधानकारक नाही. 

वर्ष २०१०-११ मध्ये १ लाख ४० हजार ७०० भारतीयांनी तर ३४ हजार ०७४ विदेशी पर्यटकांनी कान्हा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या पर्यटकाकडून प्रकल्पाला ५ कोटी ६ हजार २६६ रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्यावर्षी म्हणजे २०११-१२ ला भारतीय पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे तर विदेशी पर्यटकांमध्ये ६ हजार ६७० ने घट झाल्याचे दिसून येते. यावर्षी १ लाख ५४ हजार ९५१ भारतीय पर्यटकांनी तर २७ हजार ४०३ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यांच्यापासून ५ कोटी ९८ लाख ५० हजार ८०८ रुपयाचे उत्पन्न मिळाले. २०१२-१३ मध्ये भारतीय व विदेशी पर्यटकांमध्ये घट झाली.
यावर्षी १ लाख ०९ हजार ३५७ भारतीय पर्यटकांनी तर २१ हजार १०० विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यावर्षी ४५ हजार ५९४ ने भारतीय तर ६ हजार ३०३ ने विदेशी पर्यटकांची संख्या घटली. अशी एकूण ५१ हजार ८९४ हजाराने पर्यटकांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१३-१४ मध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटकांमध्ये किंचीतसी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. यावर्षी १ लाख १२ हजार ५३९ भारतीयांनी तर २१ हजार १३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतीय पर्यटकांमध्ये ३ हजार १८५ तर विदेशी पर्यटकांमध्ये फक्त ३२ पर्यटकांची वाढ झाल्याचे दिसून येते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कान्हा व्याघ्र प्रकल्पाला काही माहिती मागितली होती. त्यात ही माहिती देण्यात आली. वन प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी १९ आरोपींना अटक करण्यात आली.
गेल्या चार वर्षांत एकूण १७ वाघांची शिकार करण्यात आली. वर्ष २०१३ मध्ये चार प्रकरणात १, २०१२ मध्ये एका प्रकरणात १, २०११ मध्ये ७ प्रकरणात १२ आणि २०१० मध्ये ५ प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली. या व्याघ्र प्रकल्पात एकूण ६५ विविध जातीचे वृक्ष कापल्याचे आढळून आले. त्यात २०१० मध्ये २५, २०११ मध्ये १७, २०१२ मध्ये १४ आणि २०१३ मध्ये ९ वृक्षांचा समावेश आहे.कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये सहायक शल्य चिकित्सक १, वनक्षेत्रपाल २, वनपाल २५, वनरक्षक ३७, कम्पाउंडर १, सुपरवायझर १, मुख्य लिपिक १, लेखापाल १, मानचित्रकार १, स्टेनो टायपिस्ट १, जीप चालक ४, मुख्य महावत ५, सहायक महावत १०, वायरलेस ऑपरेटर १ आणि संशोधकाचे १ पद रिक्त आहे. व्याघ्र प्रकल्पात ६० वाघ आणि ७८ बिबट असल्याची माहितीही देण्यात आली.