सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यटनाला महत्त्व प्राप्त झाले असून प्रत्येक जण आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार पर्यटन करू लागला आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडून आपल्या कुटुंबासह एक दिवसाच्या सहलीसाठी येथील पिरवाडी किनाऱ्याला पसंती मिळू लागली आहे. या ठिकाणी मिळणारे ताजे मासे, घरगुती जेवण तसेच नारळपाण्याच्या ओढीने पर्यटकांच्या संख्येत काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. विशेषत: दर रविवारी पिरवाडी किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. याचा फायदा येथील स्थानिक व्यावसायिकांनाही होऊ लागला आहे.
उन्हाळी, पावसाळी व हिवाळी अशा तिन्ही ऋतूंचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटन केले जाते. मात्र अनेकांना दूरवर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने एक-दोन तासांत पोहोचता येऊन पर्यटनाची मजा लुटता येईल अशा स्थळांच्या शोधात अनेक जण असतात. उरणला समुद्रकिनारा लाभला असूनही या किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या तशी कमीच असते. मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटनाचा ओघ वाढल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. काही वर्षांपूर्वी येथे एखाद्दुसरे हॉटेल होते. यात वाढ होऊन सध्या उरणच्या किनाऱ्यावर तसेच आजूबाजूलाही पर्यटकांची खवय्येगिरी भागविणारी शाकाहारी तसेच मांसाहारी हॉटेल्स उभारली गेली आहेत. त्यामुळे काही दिवस राहण्याचीही उत्तम सोय असणारी हॉटेल्स या परिसरात तयार होऊ लागली आहेत.
उरणचा समुद्रकिनारा स्वच्छ असून येथील वाळूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कोकण आणि रायगड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध नसला तरी उरणमधील स्थानिक रहिवासी तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ांतील काही तालुक्यांतून या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या वाढू लागल्याची माहिती पिरवाडी येथील रहिवासी नाना पाटील यांनी दिली आहे. किनारा म्हटला की मासे आले. मांसाहारी आणि त्यातही आगरी पद्धतीचे घरगुती जेवण सध्या या परिसरात उपलब्ध होत असल्याने या घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सध्या गर्दी करू लागले आहेत. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तासह जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी सावधानतेचे फलकही लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, रविवारी क्षमतेपेक्षा अधिक दुचाकी तसेच चारचाकी वाहने घेऊन पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर येत असल्याने सध्या दर रविवारी उरण एस.टी. स्टॅण्ड चारफाटा येथे नागरिकांना सायंकाळी किमान दोन ते तीन तासांच्या वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे.
जगदीश तांडेल, उरण