देशभरातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद राहात असल्यामुळे पर्यटकांचा जंगलाकडील ओढा वाढलेला आहे. जवळपास सर्वच अभयारण्यातील ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाले असून, ओळखीतून काही होऊ शकते का, असा प्रकारसुद्धा घडून यायला लागला आहे. येत्या १ जुलैपासून देशभरातील अभयारण्ये पर्यटकांकरिता बंद होण्याची दाट शक्यता आहे.
पावसाळयात जंगलातील जैवविविधतेला वाहनांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. वन मजुरांनादेखील पावसाळयात गस्त घालणे कठीण जाते. तसेच जंगलातील लहान जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे दरवर्षी पावसाळयात राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात येतात. विशेष करून वन्यजीवांच्या प्रजननाचा हा कालावधी असल्यामुळे, या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठीसुद्धा अभयारण्ये बंद ठेवली जातात. यावर्षी मृग नक्षत्र सुरू होऊन तब्बल सात दिवस झालेत, पण अजूनही पाऊस येण्याचे संकेत नाहीत. त्यामुळे वन विभागाकडून अजूनपर्यंत अभयारण्यातील प्रवेशबंदीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. तरीसुद्धा शाळांच्या संपत आलेल्या सुटय़ा आणि पावसाळयातील जंगलभ्रमंतीला असलेली बंदी लक्षात घेता, पर्यटकांचा जंगलाकडील ओघ वाढीस लागला आहे.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकटय़ा विदर्भात आहेत. बोर व्याघ्र प्रकल्पावरसुद्धा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यापैकी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सहज होणाऱ्या व्याघ्र दर्शनामुळे या व्याघ्र प्रकल्पाकडे देशी पर्यटकांइतकाच विदेशी पर्यटकांचाही कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. ताडोबासह पेंच, नागझिरा-नवेगाव, बोर या अभयारण्यालासुद्धा पर्यटकांची तेवढीच पसंती आहे. इतर वन्यजीवांसह वाघांच्याही सहज होणाऱ्या दर्शनामुळे देशविदेशातील पर्यटक विदर्भाकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहे. मात्र, पावसाळयात पर्यटकांचा वने आणि वन्यजीवांना त्रास होऊ नये म्हणून किमान तीन महिने अभयारण्यात पर्यटकांना बंदी घातली जाते. देशातील सोळा राज्यात असलेल्या व्याघ्र प्रकल्पातून केवळ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात पर्यटकांसाठी खुला राहात होता. मात्र, अलीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंशत: बंद ठेवण्यात येतो. तर पेंच व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात येत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांतील या घडामोडी आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा वाढता ओढा आणि जंगलभ्रमंतीची आवड यामुळे इतर पर्यटनस्थळांपेक्षा जंगलाकडे पर्यटकांचा ओढा अधिक वाढला आहे. त्यामुळेच आता पावसाळयात जंगलदर्शन बंद होणार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढीस लागली आहे.