वाहन परवान्याकरिता ऑनलाइन मुलाखतीची योजना राबवून दलाल मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर दलालांना कार्यालय परिसरात येण्यास बंदी घातली आहे. तसेच दलालांमार्फत आलेली कामे करू नयेत, असा फतवाही काढला आहे. यामुळे एरवी दलालांनी गजबजलेली परिवहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची कार्यालये ओस पडली असून सर्वसामान्य नागरिक दलालांशिवाय आपली कामे करताना दिसून येत आहे.
– ठाणे आरटीओतील दलालराज विरोधात नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या कार्यालयात दलालमुक्तीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हालचाली सुरू केल्या होत्या. आरटीओ कार्यालयाने वाहन परवान्याकरिता ऑनलाइन पद्धत सुरू केली. एक दिवस आधी ऑनलाईनद्वारे मुलाखत घेऊन वाहन परवान्याकरिता कार्यालयात यायचे, अशी ही योजना आहे. या योजनेमुळे वाहन परवान्याची कामे करणाऱ्या दलालांवर संक्रात ओढावली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी कार्यालये दलालमुक्त करण्याचे आदेश नुकतेच जारी केले. तसेच कार्यालयात दलाल आढळला तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही दिली आहे. त्यामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दलालामार्फत कामे करू नयेत, असा निर्णय घेतला असून त्यानुसार नागरिकांची कामे करण्यात येत आहेत. दलालांमार्फत येणारे अर्ज कार्यालयात स्विकारले जात नाहीत. तसेच कार्यालय परिसरात दलालांना येण्यास बंदी घातली आहे.

दलाल एकवटले
आरटीओच्या या निर्णयाविरोधात दलाल एकवटले असून त्यांनी स्वतंत्र्य अशी संघटना स्थापन केली आहे. त्यामुळे ठाणे परिवहन कार्यालयात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आरटीओ कार्यालयाबाहेर दलालांकडून कामे करून घेऊ नका, असे पोष्टर लावण्यात आले आहेत.