येथील हिल रायडर्स अँड हायकर्स ग्रुप यांच्या वतीने पन्हाळगड ते पावनखिंड या पदभ्रमंतीला प्रारंभ झाला. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या तीनशे बांदल मावळ्यांच्या पवित्र स्मृतीला शिवभक्तांनी अभिवादन करून मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेत ८५० स्त्री-पुरुषांनी सहभाग नोंदविला.    
पन्हाळगडावरून भगवा ध्वज खांद्यावर घेऊन दगडधोंडे, चिखल, ओढे-नाले, डोंगर-द-या पार करीत एकमेकांना साथ देत एकाच ध्येयाने प्रेरित झालेले हे ८५० धारकरी दरमजल करीत अंबवडे या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचले. जवळच्या धनगर वाडय़ावर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून मोहिमेस पुन्हा जोमाने सुरुवात केली. गटागटांनी येणारे धारकरी शिवरायांचा जयघोष करीत पावनखिंडीकडे कूच करू लागले होते. तेथे पोहोचल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे व रोटरी सांगलीचे संदीप सोले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
ही मोहीम पार पाडण्यासाठी प्रमोद पाटील, युवराज साळोखे, विनोद कांबोज, सागर बकरे, सूरज ढोली, हर्षल सुर्वे, जयदीप जाधव, सचिन नरके, कीर्ती पाटील, ज्योती पाटील, प्रताप माने, अवधूत पाटील, प्रसाद कदम, सारिका बकरे आदींसह ८० स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.