स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणालीच्या (एलबीटी) विरोधात पुकारण्यात आलेल्या बेमुदत व्यापार बंद आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोलापुरात व्यापाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले. यात ११२ व्यापाऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली.
गेल्या मंगळवारपासून सोलापुरात व्यापारी महासंघाने बेमुदत बंदची हाक दिली असून, पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांनी या बंद आंदोलनाला प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल बुधवारी मात्र बंदला उत्तम प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडविले होते. गुरुवारी, तिसऱ्या दिवशी व्यापार बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नवी पेठेत बंदचा परिणाम दिसला नाही. सिद्धेश्वर मार्केट यार्ड व परिसरातील व्यापार पेठा दैनंनिद सुरू होत्या. चाटी गल्ली, तुळजापूर वेस, मधला मारुती, सराफ कट्टा, माणिक चौक, साखर पेठ आदी भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर वनकुद्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ११२ व्यापाऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. सदर बझार पोलिसांनी या सर्व व्यापारी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.