सोलापुरात बहिणीच्या घरी थांबलेल्या व्यापाऱ्याजवळील दोन लाख २० हजारांचे आठ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी बहिणीच्या घरातील दोघा मोलकरणींविरूध्द संशयित म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील भवानी पेठेतील गीता धामात हा प्रकार घडला.
कृष्णात नागेंद्रम् दलभंजन (वय ५९, रा. पर्वती, भास्कर सोसायटी, पुणे) यांनी यासंदर्भात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते व्यापारी आहेत. ते आपल्या व्यवसायानिमित्ताने सोलापुरात आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. व्यवसायाचे काम आटोपून इंद्रायणी एक्स्प्रेसने ते पुण्याकडे परत निघाले असताना वाटेत कुर्डूवाडी येथे पत्नीने पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली घेऊन पैसे देण्यासाठी पर्स काढली तेव्हा दागिन्यांच्या पर्समध्ये सोन्याच्या बांगडय़ा व पाटल्या नव्हत्या. दलभंजन यांनी तातडीने बहिणीशी संपर्क साधला असता दागिने सापडले नाहीत. दुपारी बहिणीच्या घरी काम करणाऱ्या नयन बलभीम पवार (वय ३८) व जुलेखा अलीशेर शेख (वय ४५, दोघी रा. मड्डी वस्ती, भवानीपेठ) या दोघा मोलकरणींवर चोरीचा संशय घेण्यात आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकाची घरफोडी
शहरातील विजापूर रस्त्यावर मधुबन अपार्टमेटमध्ये राहणारे जोसेफ फ्रान्सिस (वय ४४) या शिक्षकाची घरफोडी होऊन चोरटय़ांनी ७१ हजारांची चोरी केली. फ्रान्सिस हे कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यावेळी बंद घराचे कुलूप कटावणीने तोडून चोरटय़ांनी कपाटातील रोकड चोरून नेली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.