रुपयाचे अवमूल्यन झाल्याने पैशांना किंमत राहिलेली नाही, त्यातच चलनातील अनेक नाणी बंदही करण्यात आलेली आहेत. आजही एक रुपयाच्या नाण्याची गरज भासते. सध्या या एक रुपयाच्या नाण्याची टंचाई भासू लागल्याने खरेदीसाठी जाणारे खरेदीदार नागरिक व व्यावसायिकही त्रस्त झालेले आहेत.
एखाद्या दुकानात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी जाताना तसेच प्रवासाला बाहेर पडताना सुट्टे पैसे असणे आवश्यक आहे. अन्यथा बसचा वाहक, रिक्षाचालक यांच्यात व प्रवाशांत हमखास बाचाबाची होते. तर दुकानदारांनी या सुट्टय़ा पैशांच्या टंचाईवर एक मार्गच काढलेला आहे. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर एक किंवा दोन रुपये सुट्टे द्यावयाचे असल्यास दुकानातील दोन चॉकलेट गिऱ्हाईकांच्या हातात टेकविले जातात. यात आता गिऱ्हाईकांचीही पसंती बदललेली आहे. गिऱ्हाईक दुकानदारांकडून आपल्या पसंतीचे चॉकलेट मागू लागला आहे. त्यामुळे सुट्टे नाहीत म्हणून तो तक्रार करीत नसला तरी सुट्टय़ा पैशांऐवजी चॉकलेट घेणे अनेकांना पसंत नाही.
तर दुसरीकडे सध्या बँकेने पैसे काढण्यासाठी ए.टी.एम.ची सोय केल्याने ए.टी.एम.मधून केवळ शंभर, पाचशे किंवा हजार रुपयांच्याच नोटा मिळत असल्याने याच नोटा घेऊन दोन, पाच रुपयांच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत असल्याने सुट्टय़ा पैशांची टंचाई भासू लागली आहे. दुकानात सुट्टे पैसे ठेवण्यासाठी अधिक पैसे देऊन चिल्लर घ्यावी लागत आहे. याचाही फटका आता व्यावसायिकांना बसू लागला आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक तर दुसरीकडे व्यावसायिकही या सुट्टय़ा पैशांमुळे त्रस्त झाला आहे.