एलबीटी करासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची टिंबर मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात बैठक झाली. उद्या रविवारी मुंबई येथे तीन प्रमुख व्यापारी संघटनांची बैठक होणार आहे. त्यामध्ये सध्याच्या आंदोलनाबाबत मसुदा बनविला जाणार असून तो मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला जाणार आहे. या मसुद्याच्या आधारे सोमवारी निश्चितपणे निर्णय होईल, असा विश्वास या वेळी कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी व्यक्त केला.     
एलबीटी कराच्या विरोधातील कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचे व्यापार बंदचे आंदोलन शनिवारीही कायम राहिले. शनिवारी एलबीटीच्या विरोधात कसलेही आंदोलन झाले नाही. मात्र व्यापाऱ्यांची बैठक टिंबर मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात पार पडली. एलबीटीच्या आंदोलनाबाबत राज्य पातळीवर सुरू असलेल्या हालचालींची माहिती कोरगावकर यांनी दिली.    
ते म्हणाले, उद्या मुंबई येथे चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र व्यापारी महासंघ आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या तीन संघटनांची बैठक होणार आहे. परस्परविरोधी असणाऱ्या या संघटना यानिमित्ताने प्रथमच एका मंचावर येत आहेत. या बैठकीत तिन्ही संघटनांच्यावतीने संयुक्त मसुदा बनविला जाणार आहे. हा मसुदा सोमवारी मुख्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीवेळी सादर केला जाणार आहे. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत तोडगा निघेल, अशी खात्री वाटते. दरम्यान, उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कोरगावकर, प्रदीप कापडिया आदी प्रमुख व्यापारी मुंबईला रवाना झाले आहेत.