एलबीटीच्या विरोधात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी संघर्ष विरोधी कृती समितीने पुकारलेल्या व्यापार बंदला चार दिवसाच्या ‘कमर्शियल ब्रेक’ नंतर उद्या, गुरुवारपासून पुन्हा जारी ठेवले जाणार आहे. जोपर्यंत सरकार एलबीटी रद्द करीत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघर्ष विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिला. बाजारपेठा बंद राहणार असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असून नागरिकांना पुन्हा वेठीस धरले जाणार आहे.  
राज्य सरकार राज्यातील विविध महापालिका क्षेत्रात एलबीटी लागू करण्यावर ठाम असून त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीसह उपराजधानीतील व्यापारांनी २२ एप्रिलपासून बेमुदत व्यापार बंदचे आवाहन केल्यानंतर दरम्यान काळात मोर्चे, निदेर्शने, रास्ता रोको, तोडफोड, जाळपोळने व्यापारांचे आंदोलन चांगलेच गाजले. मुख्यमंत्र्याशी मुंबईत एलबीटी तोडग्याबाबत चर्चा करण्यात आली मात्र, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जवळपास २१ दिवस व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे नागरिकांची चांगलीच कोंडी झाली होती. यादरम्यान शहरातील व्यापाराचे १८०० कोटीचे नुकसान झाल्याचे चेंबरतर्फे सांगण्यात आले. शहरात सराफा बाजारामध्ये दररोज ५ कोटीचा व्यवसाय होतो. त्यामुळे बंदच्या काळात एकटय़ा सराफा बाजाराचे १०० कोटीचे नुकसान झाले.
नागरिकांची होणारी गैरसोय बघता आणि अक्षयतृतीया आणि लग्नसराईचे दिवस पाहता चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी चार दिवस व्यापार बंदला स्थगिती देऊन व्यापारी प्रतिष्ठाने सुरू ठेवली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. चार दिवसात बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात ग्राहकांनी आणि चिल्लर विक्रेत्यांनी गर्दी केली होती. चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली असून त्यात सरकार या एलबीटी लागू करण्याच्या ठाम असल्यामुळे सरकारच्या या धोरणाच्या विरोधात पुन्हा एकदा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्यापासून शहरातील मुख्य बाजारपेठा तसेच विविध व्यापारी व्यापारी संघटना संपामध्ये सहभागी होणार आहेत. चिल्लर विक्रेत्यांनाही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एलबीटीविरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष रमेश मंत्री यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले, अक्षय्य तृतीया आणि लग्नाचे दिवस असल्यामुळे नागरिकांची गैरसौय होऊ नये यासाठी बंद स्थगित करण्यात आला होता. दरम्याच्या काळात मुख्यमंत्र्यांना वेळ देण्यात आला होता मात्र, कुठलाच निर्णय न झाल्यामुळे उद्यापासून व्यापार बंद राहणार आहे. पुढील आंदोलनासंदर्भात व्यापारांची बैठक होणार असून त्यात चौकाचौकात सत्याग्रह करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. व्यापारांनी गेल्या २१ दिवसात केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर कुठलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा मंत्री यांनी दिला.