वाद्यांच्या ठेक्यात हातवारे करीत सुखेड व  बोरीच्या महिलांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास ‘बोरीचा बार’ची परंपरा यावर्षीही कायम ठेवली.
सुखेड आणि बोरी (ता. खंडाळा) गावाच्या मधून जाणाऱ्या ओढय़ाच्या काठावर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार ‘बोरीचा बार’ भरती. दोन्ही गावांतील महिला या दिवशी समोरा समोर येऊन हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहतात. डफडे, ताशा, शिंग या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर हा बार चालतो. दोन्ही गावांतील महिलांना दुपारी बाराच्या दरम्यान वाजत गाजत मिरवणुकीने ओढय़ाच्या काठावर आणले. त्यानंतर महिलांनी समोरासमोर असणाऱ्या महिलांना हातवारे करीत शिव्याची लाखोळी वाहिली. जोशामध्ये महिला पुढे पुढे सरकत होत्या. त्यांना ग्रामस्थ पाठीमागे ढकलत होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता बोरीचा बार पार पडला. त्यासाठी खूप वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. परंतु येथील महिला आपला पारंपरिक बार दरवर्षी न चुकता साजरा करतात.