गणेश विसर्जन मिरवणुकांच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, या उद्देशातून ठाणे वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मासुंदा तलाव परिसरातील मार्ग विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांसाठी खुला करून देण्यात येणार असून या मार्गावरूनच वाहनांची ये-जा सुरू असणार आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या प्रयोगामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी यंदाही हा प्रयोग पुन्हा राबविण्याचे ठरविले आहे.
ठाणे शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. अशातच दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी निघाणाऱ्या मिरवणुकांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत असल्याचे चित्र आजवर होते. ठाणे शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांना खेटूनच मासुंदा तलाव असून त्या ठिकाणी गणेश विसर्जनाकरिता भक्तगण तसेच वाहने मोठय़ा प्रमाणात येत असतात. तसेच शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरून गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते, असा वाहतूक पोलिसांचा आजवरचा अनुभव आहे. विसर्जनाकरिता येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने ठाणे स्थानक, गोखले रोड, राम मारुती रोड, टॉवर नाका, मूस चौक आदी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. तसेच गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना वाहने उभी करण्यासाठी या परिसरात जागा उपलब्ध होत नव्हती. याच पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीपासून विसर्जनाच्या दिवशी मासुंदा तलावाकडे जाणारे सर्वच रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. तसेच हा मार्ग केवळ गणेश विसर्जनाकरिता आलेल्या वाहनांसाठी खुला ठेवला होता. हा प्रयोग गणेशभक्तांनाही सोयीस्कर ठरला होता आणि शहरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीतपणे सुरू होती. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस यंदाही हा प्रयोग राबविणार आहेत. गणेश विसर्जनाकरिता आलेली वाहने टॉवर नाका येथून मासुंदा तलावाजवळील विसर्जन घाटाजवळ येतील आणि विसर्जन होताच गडकरी रंगायतन येथील चौकातून वळण घेऊन पुन्हा टॉवर नाका मार्गे जातील. तसेच नमस्कार ते गडकरी चौकापर्यंतही अशाच प्रकारचा बदल करण्यात आला आहे. या प्रयोगामुळे वाहने जागेवर थांबत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत नाही. तसेच गणेशभक्तांनाही विसर्जन करताना अडथळे येत नाहीत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली.