उड्डाणपुलालगतच्या रस्त्यांवरील धोके (गोविंदनगर व परिसर)
उड्डाणपुलाच्या निर्मितीपासून सर्वाधिक समस्यांचा सामना करणारा परिसर म्हणजे गोविंदनगरची चौफुली. शहराला सिडको, इंदिरानगर, अंबड औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या आणि महामार्गावरून मार्गस्थ होणाऱ्यांना ही चौफुली पार करणे क्रमप्राप्त ठरते. या चौकात बोगद्याचा आकार इतका लहान आहे, की दिवसभरात कोणत्याही वेळी वाहतूक कोंडी ठरलेली असते. वाहतूक पोलीस आणि सिग्नल यंत्रणा कार्यरत असली तरी वाहतूक कोंडी काही सुटत नाही. स्थानिकांसह वाहनधारकांसाठी ही चौफुली पार करणे एक दिव्यच ठरते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लांबलचक उड्डाणपुलाची संकल्पना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्यक्षात उतरवत उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल साकारल्याचा दावा केला. उड्डाणपुलावर शहरातील वाहनधारकांना ये-जा करता यावी म्हणून काही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. त्यातील एक ठिकाण म्हणजे भुजबळ फार्म. गोविंदनगर चौफुलीजवळ हे ठिकाण आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे या ठिकाणी निवासस्थान आहे. येथे ही व्यवस्था करण्यावरून आक्षेपही घेण्यात आले. आज हा परिसर वाहतूक कोंडीच्या गराडय़ात सापडला आहे. उड्डाण पुलामुळे महामार्गावरील परिसर अलीकडचा व पलीकडचा या दोन भागात विभागला गेला. लेखानगर पार केल्यानंतर मुंबई नाका परिसराकडे जाताना आणि मुंबई नाक्यावरून राणेनगरकडे येताना वाहनधारकांची कसोटी लागते. लेखानगरपासून भुजबळ फार्मपर्यंत साधारणत पुलापासून १०० फूट मोकळी जागा पडून आहे. तिचा वापर महापालिका स्थायी समितीच्या सभापतींची गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या मालमोटारी लावण्यासाठी केला जातो. पालिकेने या मोकळ्या जागेचा वापर लहान-मोठी झाडे लावण्यासाठी केला. मात्र वृक्षारोपणापर्यंतच हा उत्साह राहिला. भुजबळ फार्मजवळ पुलावरून येणारी वाहने आणि सव्‍‌र्हिस रोडवरील वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता आहे. मात्र, त्यातील एका रस्त्याचा वाहनधारक कमी प्रमाणात वापर करतात. परिणामी, सर्व वाहनांचा बोजा सव्‍‌र्हिस रस्त्यांवर पडला आहे. भुजबळ फार्मपासून जवळच गोविंदनगर चौफुलीवर दोन्ही भागांना जोडणारा ३० फूट आकाराचा बोगदा आहे. सर्वाची भिस्त त्यावर असते. एका बाजूला कमोदनगर, गोविंदनगर, काही शाळा, बँका, खासगी वित्त संस्थांची कार्यालये, पेट्रोलपंप आहे. दुसरीकडे पेठनगर, दीपालीनगरकडे मंगल कार्यालये, हॉटेल्स आहेत. यासह रुग्णालय, व्यापारी संकुल आहेत. दोन्ही बाजूंकडील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या बोगद्याशिवाय पर्याय नाही. सव्‍‌र्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची त्यात भर पडते. वाहनांची संख्या विचारात न घेता त्याची आखणी झाली. यामुळे दिवसभर चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी किमान १० मिनिटांचा कालावधी लागतो. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिग्नलची व्यवस्था असली, तरी त्यामुळे अधिक गोंधळ उडतो. वाहतूक सुरळीत करताना पोलीस हतबल झाल्याचे दिसते. काही महिन्यांपूर्वी बोगद्यात विशिष्ट उंचीवर लोखंडी अडथळा लावून अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला. त्याचा फटका इंदिरानगर परिसरातील चक्री बससेवेला बसला आहे. याच भागातील न्यू इरा स्कूलसह अन्य शाळांच्या बसेस या पलीकडेच थांबतात, त्यामुळे पालकांना जीव मुठीत धरत मार्गक्रमण करावे लागते. पुलावरील वाहने, तसेच सव्‍‌र्हिस रस्त्यावरील वाहनांसाठी वेगमर्यादेसह अन्य सूचना देणारे फलक वाहतूक विभागाने लावले आहेत. मात्र त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत वाहनचालक वाहने दामटत असल्याने अपघातांची शक्यता आहे.

हॉटेल सूर्याच्या अतिक्रमणाचे काय?
भुजबळ फार्मच्या बाजूने अतिक्रमणाचा प्रश्न तितकासा गंभीर नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. मात्र पेठेनगर, कमोदनगर, दीपालीनगर कडील परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर आहे. मध्यंतरी राबविलेल्या मोहिमेत काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढले. मात्र एका लोकप्रतिनिधीशी संबंधित ‘हॉटेल सूर्या’चे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. महापालिका ते काढण्यास तयार नाही. यामुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे.                 – सचिन कुलकर्णी (नागरिक)