शैक्षणिक सुटय़ांसह सलग आलेल्या सार्वजनिक सुटय़ा पाहून चाकरमान्यांचे गावी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचाच प्रत्यय कामोठे टोलनाक्यावर गेले काही दिवसांपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिसून येत आहे. शुक्रवारी महाराष्ट्र दिनी सकाळच्या सुमारास गावी व इतर सहलीच्या ठिकाणी निघालेल्या चाकरमान्यांच्या वाहनांच्या ताफ्यांनी कामोठे टोलनाका फुल्ल झाला. दोन किलोमीटपर्यंत ही वाहतूक कोंडी गेली होती.  त्यामुळे सायन-पनवेल टोलवेज कंपनीची टोलवसुली मोठय़ा प्रमाणात झाली. परंतु गर्दीच्या वेळी वाहने टोलवसूल न करता सोडली जातील, या आश्वासनांचा कंपनीला  विसर पडल्याने टोल कर्मचाऱ्यांना वाहनचालकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. शैक्षणिक सुटय़ा सुरू झाल्यामुळे व येणाऱ्या सलग सार्वजनिक सुटय़ा पाहून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाकरमानी गावाकडे तर काही जण सहलीच्या ठिकाणी सुटी आनंदात घालविण्यासाठी निघाले आहेत. मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी मुंबईकरांना कामोठे टोलनाक्यावरून जावे लागत असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या टोलनाक्यावर नेहमी गर्दी होत असते. शुक्रवारी महाराष्ट्र दिनी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या टोलनाक्यावरून जाणार असल्याने वाहतूक पोलीस काही वेळेसाठी येथे तैनात केले होते. मात्र या वाहतूक कोंडीचा त्रास काही प्रमाणात त्यांनाही बसला होता. दुचाकीस्वारही त्यापासून सुटले नाहीत.  दुचाकी वाहनांना जाण्यासाठी कामोठे टोलनाक्यावर डाव्या हाताला एक राखीव रांगेची तरतूद टोलवसूल कंपनीने केली आहे. मात्र तेथेही चारचाकी वाहनांनी गर्दी केल्याने दुचाकीस्वारांना अडथळ्याला तोंड द्यावे लागले.  नेहमी हीच परिस्थिती अनुभवयास मिळत असल्याने कामोठे टोलनाक्यावर खारघर टोलनाक्याप्रमाणे उड्डाणपुलाच्या समाप्तीनंतर वीस मीटर अंतरापासून रांग राखीव ठेवावी अशी मागणी दुचाकीस्वारांची मागणी आहे. मात्र ही मागणी कोणत्याही राजकीय पक्षांनी लावून धरली नसल्याने याकडे टोलवसूल करणाऱ्या कंपनीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान,  मुंबईकरांना सायनहून कामोठे येथे येण्यासाठी पंधरा मिनिटे लागली मात्र कामोठे टोलनाक्यावर अर्धा ते एक तासांच्या वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली. एकीकडे कामोठे टोलनाक्यावर भली मोठी वाहनांची रांग पाहावयास मिळत असताना मुंबईकडे जाणाऱ्या खारघर टोलनाक्यावर रोजच्यापेक्षा वाहनांची गर्दी कमी असल्याचे शुक्रवारी पाहावयास मिळाले.