मुंबई, गोवा व कोकणात जाण्यासाठी नवी मुंबईमार्गे गव्हाण फाटा ते चिरनेर दरम्यान चार पदरी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने सध्या या मार्गावरही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उरण-पनवेल रस्त्यावर याचा परिणाम होऊ लागला आहे. प्रामुख्याने शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातून कोकणात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.  उरण तालुक्यातील पूर्व विभागाला पनवेल तालुक्याशी जोडण्यासाठी पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा ते चिरनेर दरम्यानचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केला आहे. या रस्त्यावर पूर्वी एस.टी.बसशिवाय कोणतेही वाहन दिसत नव्हते. तर काही वर्षांपूर्वी आलेल्या जेएनपीटी बंदरामुळे गव्हाण, गावठाण, जांभूळपाडा, दिघोडे, वेश्वी, चिर्ले आदी ठिकाणी गोदामांची निर्मिती झाल्याने कंटेनर वाहतुकीतही वाढ झाली आहे. या वाढत्या वाहनांकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. तर जेएनपीटीने कोप्रोली ते साई दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण केले आहे.
पूर्वी मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईवरून गोवा तसेच कोकणात जाण्यासाठी पनवेलमार्गे प्रवास करावा लागत असे. मात्र गव्हाण फाटा ते चिरनेर व चिरनेर साई असा मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा रस्ता तयार झाल्याने वेळ आणि इंधनाची बचत करण्यासाठी कोकणात जाणारे या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील गोदामांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. परिणामी या मार्गावरील वाहतुकीतही वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती उरण वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांनी दिली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी पनवेल तसेच उरणमधील वाहतूक विभागाने संयुक्तरीत्या काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.