19 September 2020

News Flash

वाहतूक खोळंबापुरी!

मागील पावसाळ्यात खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांचा राग मुंबईकरांच्या मनात अद्याप आहे आणि निवडणुकीत तो आपल्याविरोधात जाऊ शकतो, याची बहुधा कल्पना शिवसेनेला झाली आहे.

| February 18, 2014 08:29 am

* एकाच वेळी १५० रस्त्यांची कामे सुरू
* आणखी १०३ रस्ते लवकरच दुरुस्तीला   ल्ल पादचारी हैराण
मागील पावसाळ्यात खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांचा राग मुंबईकरांच्या मनात अद्याप आहे आणि निवडणुकीत तो आपल्याविरोधात जाऊ शकतो, याची बहुधा कल्पना शिवसेनेला झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या ऐन तोंडावर संपूर्ण मुंबईभर रस्ते गुळगुळीत करण्याची घाई शिवसेनेला झाली आहे. मात्र ही कामे करताना वाहतूक, भूगोल आदी गोष्टींकडे पुरेसे लक्ष न दिल्याने सर्वत्र खोदलेले रस्ते, खोदकामांचे ढीग, तुंबलेली वाहतूक आणि या सगळ्या गदारोळातून पडत-धडपडत वाट काढणारे नागरिक यामुळे मुंबापुरीला वाहतूक खोळंबापुरीचे स्वरूप आले आहे.
पावसाळ्यात ‘खड्डय़ांत गेलेल्या’ रस्त्यांमुळे नाराज झालेल्या मतदारांचा राग निवडणुकीत ओढवू नये यासाठी शिवसेना-भाजपने मुंबईतील सर्व रस्ते गुळगुळीत करण्याचा विडाच उचलला आहे. गुळगुळीत रस्त्यांसाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी तब्बल ७५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी या संधीचा फायदा उठवून आपापल्या परिसरातील रस्त्यांची पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीमध्ये वर्णी लावून घेतली. शहरातील नऊ वॉर्डमधील सुमारे १५० रस्त्यांची कामे एकाच वेळी हाती घेण्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही अशाच पद्धतीने मोठय़ा प्रमाणावर रस्तेनिर्मितीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.
अनेक रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. काही ठिकाणी अरुंद रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात आल्याने बेस्ट बस, ट्रक, कचऱ्याच्या गाडय़ा, सिमेंट काँक्रीटचे मिक्सर, टँकर आदींची कोंडी होऊन वाहतुकीचा पुरता बोजवारा उडत आहे. अनेक वेळा दिवसभर या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून वाहतूकचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. फेरीवाल्यांचे पदपथांवरील अतिक्रमण आणि वाहतुकीची कोंडी यामुळे रस्त्यावरून (अथवा पदपथावरून) चालणे एक दिव्य होऊन बसले आहे.
या खोदकामामुळे बेस्ट बसेसचेही मार्ग वळविण्यात आले आहेत. आधीच वाहतूक कोंडीमुळे मंदावलेला बसेसचा वेग आणि त्यात रस्ता बदलल्याने लागणारा जादा वेळ यामुळे प्रवाशांची अवस्था ‘सहन होत नाही, सांगता येत नाही,’ अशी झाली आहे. वाहतूक कोंडीत टॅक्सी अथवा रिक्षा अडकल्यानंतर होणारा विलंब आणि धावणारे मीटर असा दुहेरी फटका त्यांना बसत आहे.
शहरातील १५० पैकी केवळ ३७ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असताना आता आणखी १०३ रस्त्यांची कामे हाती घेण्याची तयारी पालिकेत सुरू आहे. या १०३ रस्त्यांमध्ये पालिकेच्या नऊ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांचा मुख्यत्वे समावेश आहे. ज्या रस्त्यांवर अपवादानेच वाहने धावतात अशा छोटय़ा गल्ल्यांची दुरुस्ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ही रस्तेदुरुस्ती नक्की कोणासाठी, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
पावसाळ्यात खड्डय़ांत जाणाऱ्या रस्त्यांमुळे मुंबईकर यंदा प्रचंड संतापले होते. दरवर्षीच्या पावसाप्रमाणेच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पालिका आयुक्त आदींनी खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना झापण्याचे नाटकही यथास्थित पार पाडले होते. मात्र या नाटकाला जनता आता फसणार नाही, याची जाणीव शिवसेनेला झाली असावी. त्यामुळेच निवडणुकांच्या आधी ही रस्तेदुरुस्तीची घाई उडवून देण्यात आली आहे.

‘नाना’हट्टामुळे कामे खोळंबली
आपल्या विभागातील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे, असा हट्ट बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय ऊर्फ नाना आंबोले यांनी धरला असून त्यामुळे तब्बल १० रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. प्रशासनाने या रस्त्यांच्या निर्मितीचे कार्यादेश कंत्राटदारांना दिले आहेत. मात्र शिवसैनिकांनी कामे बंद पाडल्याने कंत्राटदार बिथरले आहेत. परळमधील दत्ताराम खामकर मार्ग, डॉ. शिरोडकर रोड आणि शिरोडकर क्रॉस लेन, नाना पालकर मार्ग, दादाभाई चमारबागवाला लेन, सुभानराव नलावडे मार्ग, सीताराम पालतुराम मुराज मार्ग, सेंट पॉल मार्ग, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, गोखले सोसायटी रोड, डॉ. बाटलीवाला रोडच्या पुनर्बाधणीची कामे पालिकेने पहिल्या टप्प्यात हाती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करावे, असा हट्ट आंबोले यांनी धरला आहे. नियमानुसार ६० फूट रुंदीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येते. पण आंबोले यांच्या विभागातील हे रस्ते अतिशय लहान आहेत. अधिकाऱ्यांनी ही जाणीव करून दिली. परंतु ते आपला हेका सोडायला तयार नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:29 am

Web Title: traffic full mumbai
Next Stories
1 जेईईचा अभ्यास अंगठय़ांच्या टिप्सवर
2 ‘बाजा, २०१४’साठी व्हीजेटीआयची ‘ऑफ रोड’ कार सज्ज
3 ‘बेस्ट समिती’त स्वीकृत सदस्य चमकले
Just Now!
X