उरण-पनवेल राज्य महामार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहत थांब्यावर खासगी वाहने बेकायदा थांबविले जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. या कोंडीमुळे विद्यार्थ्यांसह कामगार, व्यावसायिक हैराण झाले आहेत. बेकायदा वाहनांवर कारवाई करूनही त्यांचा अडथळा कायम असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
जेएनपीटी बंदर व त्यावरील आधारित उद्योग तसेच नवी मुंबई, मुंबई व पनवेल परिसरांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे एनएमएमटीने नवी मुंबईतील जुईनगर ते जेएनपीटी कामगार वसाहत दरम्यान थेट बससेवाच सुरू केली आहे. तसेच या ठिकाणावरून खासगी रिक्षा, जीपही प्रवासी वाहतूक करीत आहेत. उरण-पनवेल राज्य महामार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहत हा येथील महत्त्वाचा बस थांबा आहे.
उरण तालुक्यातील बहुतेक गावातील प्रवासी याच थांब्यावर येऊन एस.टी. तसेच एनएमएमटीच्या बसेसने प्रवास करीत आहेत. या ठिकाणावरून खासगी रिक्षा, जीपही प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यामुळे या थांब्यावर सकाळी तसेच सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र बस येण्याच्या वेळेलाच बसेसना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने खासगी वाहने लावली जात असल्याने या थांब्यावरील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांना कारखाना, कार्यालयात तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होत अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे.
या संदर्भात उरणचे वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता याची दखल घेत पोलिसांनी आतापर्यंत तीस ते चाळीस वाहनांवर कारवाई करून वाहने ताब्यात घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुढेही या बेशिस्त वाहनांवर अशीच कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.