03 August 2020

News Flash

कोंडीचा चक्रव्यूह

शहरातील मुंबई नाका-चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून द्वारका चौफुलीची ओळख आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग या चौकात एकत्र येतात.

| May 20, 2015 08:14 am

शहरातील मुंबई नाका-चौकानंतर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून द्वारका चौफुलीची ओळख आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्ग या चौकात एकत्र येतात. बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांना मध्यवर्ती ठरणारा हा चौक प्रवासी वाहने, एसटी बस, मालमोटारी, दुचाकी वाहने आणि पादचाऱ्यांमुळे नेहमीच ओसंडून वाहतो. वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यामध्ये कोणताही समन्वय नसल्याने पादचारी व वाहनधारक वाऱ्यावर सोडले गेल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी नित्याची झाली असताना अपघातांची अखंड मालिका सुरू आहे.
द्वारका चौकालगत महामार्गाच्या दुतर्फा रुग्णालये, राजकीय पक्षांची कार्यालये, वाहनांची दालने, हॉटेल्ससह राज्य शिक्षण मंडळाचे कार्यालय, प्राप्तिकर कार्यालय यांसह नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. पुणे व शिर्डीहून नाशिकला येणारे तसेच नाशिक रोड भागात ये-जा करणाऱ्यांना या चौकातून मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त ठरते. तसेच मुंबई-आग्रा महामार्गाला समांतर सव्‍‌र्हिस रस्त्यावरील वाहने वेगळीच. यामुळे चौकातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांचे प्रमाण इतर ठिकाणांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. उड्डाणपुलाखाली काहींनी आपला संसार थाटला असून सायंकाळी मद्यपींची मैफल रंगते. दुसरीकडे, द्वारका चौफुलीलगत उड्डाण पुलावर जाण्यासाठी रस्ता आहे. एका बाजूला उड्डाण पुलावर जाण्यासाठी तसेच उतरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
या दोन्ही ठिकाणी वाहनांची चढाओढ सुरू असते. त्यात सव्‍‌र्हिस रस्त्यावरील या जागेवर प्रवासी वाहने प्रवाशांच्या शोधार्थ उभी राहतात. ही बाब अपघातांना निमंत्रण देणारी आहे. याच भागातून पुलावर प्रतिबंध असूनही दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांची नजर चुकवून वर-खाली येताना दिसतात.
द्वारका चौफुली परिसरात याहून बिकट परिस्थिती आहे. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र भुयारी मार्गातून जाण्यासाठी लागणारा वेळ, असुरक्षिततेची भावना यामुळे पादचाऱ्यांकडून मुख्य रस्त्याचा अवलंब केला जातो. परिणामी भुयारी मार्ग आज मद्यपी, जुगारींचा अड्डा बनला आहे. भुयारी मार्गाच्या मारुती मंदिराजवळील प्रवेशद्वाराजवळ रिक्षाचालकांचा गराडा पडलेला असतो. सिडको, सीबीएसकडे जाणारे प्रवासी शोधण्यासाठी रिक्षाचालक थेट रस्त्यावर उतरतात. पलीकडील बाजूस नाशिक रोडकडे जाणाऱ्या रिक्षांची भली मोठी रांग दिसते. रिक्षा कमी म्हणून की काय, बाहेरगावहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीचा द्वारका पोलीस चौकीजवळ व समोर थांबा आहे.
एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागले. प्रत्यक्ष चौफुलीवर छोटेसे वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. शालिमार, मुंबई नाका, नाशिक रोड आणि पंचवटीमार्गे येणारी वाहतूक या बेटाच्या माध्यमातून पर्यायी मार्गावर वळविली जाते. कोणी कुठूनही व कसेही मार्गस्थ होत असल्याने वाहतुकीचा बट्टय़ाबोळ उडतो. परिसरात फेरीवाले, हातगाडीवाले आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल या कोंडीत अधिक भर टाकतात.

नियोजन चुकीचे..
द्वारका चौफुलीवर उड्डाणपुलाचे नियोजन पूर्णत: चुकले आहे. पुलाच्या निर्मितीपासूनच अपघातांची मालिका आणि वाहतूक कोंडी हे प्रश्न भेडसावत आहेत. भुयारी मार्ग बांधताना दुचाकीस्वारांसाठी या ठिकाणी व्यवस्था होणे गरजेचे होते. केवळ पादचाऱ्यांसाठी असलेल्या या मार्गाकडे दुर्लक्ष झाले. उड्डाणपुलाचा वापर स्थानिकांकडून किंवा बाहेरील वाहनचालकांकडून होत नसल्याने वाहतूक कोंडीत भरच पडते. वाहतूक बेटाचे योग्य नियोजन होणे गरजेचे असून परिसरातील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविल्यास परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल.
सचिन मराठे (नगरसेवक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2015 8:14 am

Web Title: traffic jam in nashik
टॅग Nashik
Next Stories
1 एसटी कॉलनीत अतिक्रमण हटाव मोहीम
2 खड्डय़ांसह सजलेले ग्रामीण भागातील अरुंद रस्ते
3 गतिरोधकच प्राणघातक ठरला!
Just Now!
X