डोंबिवलीतील अतिशय वर्दळीचा असणाऱ्या चार रस्ता (फडके वॉच) ते गावदेवी मंदिरापुढील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी पालिकेने बुधवारपासून या रस्त्यावर खोदकाम सुरू केले आहे. वाहतुकीचे कोणतेही नियोजन न करता, नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेने हे काम सुरू केल्यामुळे गुरुवार सकाळपासून या रस्त्यावर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली आहे.   
काँक्रीटीकरणाच्या कामासाठी मानपाडा चार रस्त्यापासून पुढे एक बाजू खोदण्यात आली आहे. या रस्त्यावरून एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ आणि वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर एका बाजूने वाहतूक सुरू झाली. त्यामुळे एका बाजूला येणारी आणि जाणारी वाहने गुरुवारी सकाळी जागोजागी अडकून पडली होती. शिळफाटाकडून येणारी वाहने डोंबिवलीत मानपाडा रस्त्याने शहरात येतात. त्याच वेळी शहरातून बाहेर जाणारी वाहने मानपाडा रस्त्याने शीळफाटय़ाकडे वळतात. वाहतुकीची नागरिक, चालकांना कोणतीही पूर्वसूचना नसल्याने शहराबाहेर जाणारे वाहनचालक मानपाडा रस्त्याने गुरुवारी सकाळी बाहेर पडत होते. त्याच वेळी शहराबाहेरील वाहने मानपाडा रस्त्याने शहरात येत होती. मानपाडा रस्त्याला सागाव, गांधीनगर, संगीतावाडी, चार रस्ता येथे क्रॉस रोड आहेत. या क्रॉस रस्त्यावरील वाहने मानपाडा रस्त्याला येऊन मिळत असताना अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी आज सकाळी मानपाडा रस्त्यावर झाली होती.
सकाळच्या वेळेत वाहतूक पोलीस या भागात नसल्याने सर्व वाहने उशिरापर्यंत एकाच जागी उभी होती. अखेर काही वाहनचालकांनी वाहने घरडा सर्कल, रामचंद्रनगर भागातून बाहेर काढल्याने हळूहळू वाहतुकीची कोंडी कमी झाली.