वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरची कारवाई २ लाखाने वाढली
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी अभिनव शक्कल लढविली आहे. वाहतूक पोलिसांनी अधिकाधिक कारवाई करून वाहनचालकांना शिस्त लावावी यासाठी वाहतूक पोलिसांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक वाहतूक पोलिसाच्या कारवाईची संगणकीकृत नोंद ठेवण्यात येऊ लागली आहे. ज्यांची कामगिरी ‘कमी’ आहे अशांना दर आठवडय़ाला वरिष्ठांसमोर हजर राहून लेखी जवाब द्यावा लागतो. या तंत्रामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधातील कारवाई गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन लाखांनी वाढली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून अपघातांना आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईत १९ वाहतूक विभागांत १८०० वाहतूक पोलीस हवालदार आहेत. त्यांना प्रत्येक दिवशी किमान १० केसेस करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आठवडय़ाला किती कारवाई केली त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागतो. या प्रत्येक वाहतूक हवालदाराने केलेल्या कारवाईचा तपशील संगणकात साठवला जातो. कमी केसेस करणाऱ्यांना मग उपायुक्तासमोर हजर राहून लेखी खुलासा करावा लागतो. प्रत्येक विभागातून आठवडय़ाला कमी कामगिरी करणाऱ्या पाच पोलिसांना हजर राहावे लागते. प्रथम ताकीद दिली जाते तर नंतर पोस्टिंग बदलण्यात येते. एका पोलिसाची कामगिरी जर तीनपेक्षा अधिक वेळेला खालावली असेल तर अशाची वाहतूक विभागातून शस्त्रास्त्र किंवा अन्य विभागात बदली करण्यात येते, तर ज्यांनी चांगली कामगिरी केली असेल त्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात येते.
गेल्या काही महिन्यांपासून मी माझ्या विभागात ही पद्धत सुरू केली. त्यामुळे कारवाईत दोन लाखांनी वाढ झाली, अशी माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) प्रताप दिघावकर यांनी दिली. देशात रस्ते अपघातात दीड लाख तर राज्यात तेरा हजार जण मरण पावतात. त्यामुळे बेदरकार वाहने चालविणाऱ्यांना आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वचक बसणे आवश्यक आहे, असेही दिघावकर यांनी सांगितले. वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यासाठी मोबाइल न्यायालयाचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुंबईत एकूण पाच मोबाइल न्यायालयांची मागणी वाहतूक पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असेल त्याच ठिकाणी न्यायाधीश असेल आणि तात्काळ तो नियम मोडणाऱ्यांच्या गुन्ह्याचा निकाल देईल.

वाहतूक पोलिसांची कारवाई वाढली
    २०१२(मे पर्यंत)    २०१३ (मे पर्यंत)
    पश्चिम- १,७४,०००    २,२७,०००
    उत्तर- १,१०,०००    १,५०,०००
    पूर्व-  १,७१,०००    २,८३,३००,
४ लाख ५५ हजार ६ लाख ६० हजार ३००