वाहतूक सुरक्षा अभियानांतर्गत सध्या नाशिक जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यातर्फे वाहतुकीच्या नियमावलीबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थी व वाहनधारकांना अवगत करण्यात येत आहे. शहरातील वाहतुकीची अवस्था बिकट आहेच, पण धोकादायकही बनली आहे. या अभियानाच्या निमित्ताने शहरातील जागरुक नागरिक गोविंद माळी यांनी नोंदविलेली निरीक्षणे व सूचना महत्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत. भरधाव जाणारे अगदी पोलिसांच्याही हाती लागत नाहीत. कागदपत्रे तपासण्यासाठी पोलिसाने वाहन थांबवले तरी चालक थांबत नाहीत. पोलीस मागून गाडी धरतो व ओढतो. पण चालक शिताफीने निसटून जातो. हताश पोलीस बघत राहतो.. नाशिक सारख्या विकसनशील शहरातील रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीचे लिखीत-अलिखीत नियम मोडण्यात कोण पुढे जातो याची स्पर्धा सुरू आहे. एखाद्याच्या पुढे जाऊन वेग कसा कमी करावा यात वाहनवीरांना कोणीच मागे टाकू शकत नाही. आपण वाहन असुरक्षित चालवत आहोत हे त्या बिचाऱ्या वाहनचालकाला समजत नाही. रस्त्यावरील रहदारी सुरळीत न चालण्यामागे वाहनांची वाढलेली संख्या, रहदारी नियंत्रणाच्या सोयी, यंत्रणांचा अभाव, शहरातील जुन्या चौकांची रचना आदी कारणे आहेत. वाढती लोकसंख्या, व्यापार व शैक्षणिक व प्रशासनिक व्यवहार आदींच्या प्रचंड वाहतुकीला रस्त्यांची व चौकांची जुनी मापे कशी पुरी पडणार ? ज्या ठिकाणी रहदारी व वाहन चालविणे म्हणजे एक दिव्य होऊन बसते. सुरळीत व सुरक्षित रहदारी व वाहतुकीसाठी वाहनचालक, शासकीय-निमशासकीय व इतर जबाबदार घटकांनी विचार व कृती करणे आवश्यक आहे, असे माळी यांनी सुचविले आहे.
वाहनचालकांकडून घडणाऱ्या धोकादायक बाबी
* रस्त्यावर नागमोडी चालीने वाहने अतिशय वेगाने जातात.
* सतत पुढच्या वाहनाला मागे टाकण्यासाठी आकाश पाताळ एक करतात. मात्र, पुढे गेल्यावर संथ होतात.
* रस्त्याच्या डाव्या बाजुला व्यवस्थित जाणाऱ्या गाडीच्याही डाव्या बाजुने जाणे. तोकड्या जागेतून, ‘हॉर्न’ न वाजविता चटकन पुढे जातात.
* पुढील वाहनाच्या पुढे, हात न दाखविता, मागून तिरपे तिरपे येतात. त्याने चुकुन वेग वाढविला तर तो आपल्या वाहनावर येऊन आदळेल याची फिकीर ते करीत नाहीत. (हा प्रकार लोकप्रिय आहे.)
* चौकात समोरील सिग्नल लाल असल्यास पादचारी मार्गाच्याही पुढे रस्त्यावर येऊन थांबतात. सिग्नल बदलण्याच्या आतच वाहन पुढे दामटतात.
* काही रस्ते एकमार्गी असतात. तसा फलकही असतो. पण त्याची अजिबात पर्वा न करता मनाई असलेल्या दिशेकडून वाहनधारक बिनधास्त येतात. बरोबर दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी त्यांची सुरक्षा बघून घ्यावी.
* वाहनतळ – आधीच उभ्या केलेल्या वाहनांच्या मागे वाहनांचा दुसरा थर लावतात. जागा नसल्यास वाहने आडवी लावतात. असे करताना बराच रस्ता व्यापला जातो. याची जाणीव कोणी ठेवत नाही. यावर काही उपाय झालेला दिसत नाही. या ठिकाणी रस्ते मुख्यत: वाहनतळासाठीच वापरले जातात. ही नव्याच प्रकारची वाहनतळाची सोय आहे.
* तसेच काही रस्त्यावर तारखेनुसार वाहनतळ असतो. चालक ती जागा सोडून मनाला वाटेल तिथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहनतळाची जागा अजून कमी होते. अशावेळी वाहतूक पोलीस वाहने उचलून नेतात. ते योग्यच आहे. त्यात काही अन्याय होतात. दररोज शेकडो वाहने उचलून नेली जातात. वर्षांनुवर्ष ही कारवाई केली जात आहे. यावरून अनेक वाहनधारक नियम शिकायला तयार नाही असे लक्षात येते.
* शहराचा जुना भाग छोटय़ा रस्त्यांचा पण ठरलेल्या वस्तुंच्या व्यापाराचा असतो. जसजसा विकास होतो, तसतसे दुप्पट-तिप्पट लोक या आकाराने लहान भागात वावरतात. रहदारीच्या सगळ्या समस्या तिथे निर्माण होतात. यावर काय उपाय करावेत यासाठी तेथील नागरीक, व्यापारी व तज्ज्ञांची चर्चा केली तर सर्वाच्या सोयीचे उपाय शोधून काढणे शक्य व्हावे. त्यातील काही वस्तुंची केंद्रे आता नाशिकच्या नव्या भागात स्थापन होत आहेत, ही चांगली बाब आहे. उदा. सराफ बाजार. या नव्या ठिकाणी म्हणजे बाजारपेठेत योग्य अंतरावर वाहनतळाच्या जागेचे सुरूवातीपासून नियोजन करणे गरजेचे आहे. कारण, यासाठी योग्य जागा नंतर मिळणे दुरापास्त होते. (पुर्वार्ध)