तब्बल ७५ वर्षांनी मरिन ड्राइव्हच्या संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती व सौंदर्यीकरण होत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेने आराखडा तयार केला असला तरी वाहनांच्या गर्दीने कार्यालयात जाणाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. फेब्रुवारीत सुरू झालेले हे काम पूर्ण होण्यासाठी १० महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याने गर्दीच्या वेळा तसेच पावसाळ्यात परिस्थिती आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.
दक्षिणेकडे एनसीपीएपासून सुरू होणाऱ्या मरिन ड्राइव्हच्या ४.३ किलोमीटर रस्त्याचे सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम ३१ जानेवारीपासून हाती घेण्यात आले. यात सुरुवातीला रस्ता दुभाजक व त्याच्या बाजूच्या रस्त्याचे काम, त्यानंतर बाजूचा रस्ता, त्यानंतर फुटपाथ अशी कामे सिग्नल ते सिग्नल अशा टप्प्यात हाती घेण्यात येणार आहेत. सुरुवातीला दक्षिणेकडील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने आधीच वाहनांसाठी अरुंद ठरणारा रस्ता आता आणखी चिंचोळा बनला आहे. या रस्त्यावरूनच वर्ल्ड ट्रेड सेंटपर्यंत जाणाऱ्या वाहनांचा मार्ग असल्याने कार्यालयीन वेळांमध्ये चर्चगेट स्टेशनच्या दिशेने गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
गिरगाव चौपाटी ते मादाम कामा रोड या भागात मॅस्टीक वापरून रस्ता गुळगुळीत करण्यात येणार आहे. संपूर्ण रस्त्याच्या तुलनेत हा ७० टक्के भाग आहे. या भागात वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्त्याचा दर्जा अधिक चांगला करण्यावर भर दिला जाणार आहे. उच्च प्रतीचे बिटुमीन वापरण्यात येत असल्याने रस्त्याचे आयुष्यमान वाढेल. रस्त्याच्या इतर भागाचे काँक्रिटीकरण केले जाईल.
वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी टप्प्याटप्प्यात काम हाती घेतले असून वाहतूक पोलिसांशी चर्चा करूनच कामाचे टप्पे आखण्यात आले आहेत. रस्त्याच्या मधील भागाचे काम रात्रीच्या वेळीस तसेच सुट्टय़ांच्या दिवशी केले जाते, त्यामुळे वाहनांना व प्रवाशांना कमी त्रास सहन करावा लागेल, असे पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.