अतिक्रमणामुळे उरण शहरातील रस्ते अरुंद झाले असताना त्यात दररोज वाहनांची संख्याही वाढू लागली असून, यामध्ये रस्त्यावरील बेकायदा फेरीवाल्यांची यात भर पडू लागली आहे. त्यामुळे केवळ सुट्टीच्या दिवशी व सायंकाळी होणाऱ्या उरण शहरातील वाहतूक कोंडीत वाढ होऊन ती आता नित्याची झाली आहे. नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे उरणमधील रहिवासी तसेच ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अनेकदा निर्णय घेऊनही नगरपालिका तसेच वाहतूक विभागाने पार्किंगचे फलक लावूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. यावर उपाय म्हणून नगरपालिका व वाहतूक विभागाने शहरात पार्किंग व्यवस्था करून टोइंग व्हॅनचे नियोजन केलेले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या दोन्ही विभागांना वेळ मिळत नसल्याने याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.
इतर शहरांप्रमाणेच उरण शहरातही दररोज वाहतूक कोंडी होत असली, तरी उरण शहरातील वाहतूक कोंडीत दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. संध्याकाळी तसेच सुट्टीच्या रविवार आणि शनिवार या दिवशी होणारी वाहतूक कोंडी सध्या वाढली आहे. दुपारी दोन वाजताही सध्या उरण शहरात वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उरण पोलीस, वाहतूक विभाग तसेच नगरपालिका यांच्या अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये उत्तम चर्चा झाली, मात्र त्याची गेल्या अनेक वर्षांत अंमलबजावणी न झाल्याने शहरातील वाढत्या वाहन संख्येबरोबर वाढत्या बेशिस्तीमुळेही वाहतूक कोंडीच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे.
शहरात अनेक ठिकाणी चारचाकी वाहने उभी करून समोरील दुकानात खरेदी करणे, एखादे वाहन अडकून पडल्यानंतर ते बाहेर निघण्याची वाट न पाहता दुचाकी तसेच चारचाकी वाहन मध्येच घुसविणे, आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यावर कहर म्हणजे वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनांवर न होणारी कारवाई करायला गेले की, राजकीय नेत्यांचा होणारा हस्तक्षेप हेही एक मुख्य कारण पुढे येऊ लागले आहे.
या संदर्भात उरणचे वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता नगराध्यक्षांशी बोलून वाहतुकीचे नियंत्रण केले जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.