पोलीस ठाण्याविषयी अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. पोलीस दलाचे काम कसे चालते? आरोपींशी त्यांचे वर्तन कसे असते? याची माहिती करून घ्यायची असेल, तर शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही पोलीस ठाणे पाहता येईल. तसेच ८ जानेवारीला ‘पोलीस आपल्या दारी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य पोलीस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. या बरोबरच वाहतूक पंधरवडाही साजरा होणार आहे.
खराब रस्ते व पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे शहराची वाहतूक हा नेहमीच डोकेदुखीचा विषय असतो. पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरक्षा पंधरवडय़ानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ‘शहरासाठी दोन तास’ या कार्यक्रमांतर्गत पोलीस उपनिरीक्षक सुदाम भागवत चौका-चौकात वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन करीत आहेत. उपायुक्त सोमनाथ घार्गे व वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजित बोराडे यांच्या उपस्थितीत बुधवारी रिक्षा व बसवर घोषवाक्य डकविण्यात आले. सकाळी महापौर कला ओझा यांच्या उपस्थितीत सुरक्षा रॅलीही काढण्यात आली.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, ही जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. मात्र, पार्किंग कोठे करावी, याचे नियोजन करण्याची जबाबदारी पोलिसांची नसल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. अधिक चांगल्या पार्किंगची व्यवस्था झाली तर वाहतूक सुरळीत राहू शकते. ती कोठे अडू नये, याची काळजी आम्ही घेत आहोत, असे ते म्हणाले होते. वाहतुकीच्या अंगाने १ ते १५ जानेवारीदरम्यान विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्तही विविध कार्यक्रम होणार आहेत.
‘अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडिया’ या विषयावर कार्यशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईनची सोय, पोलीस वाद्यवृंदाचे प्रदर्शन असेही कार्यक्रम होणार आहेत.