युवकांना शिक्षण, प्रशिक्षण व रोजगार दिला गेला, तरच देशाचे भविष्य घडेल. त्यासाठी सरकारने दीर्घकालीन धोरण राबवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विवेकानंद संस्कार संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात स्वामी विवेकानंद व २०२० मधील भारत या विषयावर फडणवीस बोलत होते. अॅड. संजय पांडे, डॉ. सोपानराव जटाळ, डॉ. राजेश पाटील, डॉ. एस. बी. सलगर, यशवंत जोशी उपस्थित होते. नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकात पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी निधी संकलनाचा प्रारंभही या वेळी करण्यात आला. फडणवीस म्हणाले की, चीन, जपान, जर्मनी या देशांनी आपल्या देशातील तरुणांसाठी शिक्षण, प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध केली. त्यातून त्यांचा चांगला विकास झाला. आपल्या देशात दरवर्षी किमान ५ कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याची गरज असताना त्यासाठी प्रत्यक्षात होणारी तरतूद केवळ एक कोटीची आहे. मानवी साधनसंपत्तीबाबतही नियोजन करण्याची गरज आहे. युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी नियोजन केले नाही, तर ही पिढी भरकटण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला.
युवा शब्द उलटा वाचला तर वायू होतो. त्याला योग्य दिशा दिली तर त्याचे रूपांतर प्राणवायूत होते व दिशा मिळाली नाही तर वेगवान वाऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. आज काहीच जिल्हे नक्षलवादी कारवायांनी त्रस्त आहेत. उद्या याचा प्रभाव व्यापक होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. तलवारीच्या जोरावर जग जिंकता येत नाही तर त्याला विचाराचीच जोड असली पाहिजे, असे सांगून ११ सप्टेंबर १८९३ रोजी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात विवेकानंदांनी जग जिंकले. त्या काळात समृद्ध असलेल्या अमेरिकेनेही विवेकानंदांचे विचार मान्य केले होते. आजही बराक ओबामा विवेकानंदांच्या विचारांबद्दल अभिमान बाळगतात. आधुनिक विज्ञानाला आध्यात्मिक विज्ञानाची जोड दिली तर देश चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकेल. सुसंस्कृत, साक्षर व समरस भारत निर्माण करण्यासाठी विचारांवर श्रद्धा ठेवून कृतीची जोड दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
अॅड. संजय पांडे यांनी प्रास्ताविक, तर देवीकुमार पाठक यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत देशमुख यांनी गीत, तर डॉ. तेजस्विनी अयाचित यांनी पसायदान म्हटले.