उन्हाळ्याच्या सुटय़ांमुळे रेल्वेतील आरक्षण यादी लांबली आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन महिन्यांपर्यंत आरक्षण मिळणे कठीण आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून सुटी बाहेर गावी घालवावी यादृष्टीने तसेच लग्नकार्य सुरू झाल्यामुळे रेल्वेगाडय़ांमध्ये गर्दी वाढत आहे.
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस या गाडीला २३ मेपर्यंत तर नागपूर- मुंबई दुरांतोमध्ये ७ एप्रिलपर्यंत आरक्षण उपलब्ध नाही. नागपूर-पुणे एक्सप्रेसचीही तिच परिस्थिती आहे. नागपूर-पुणे गरीबरथ, अमरावती -जबलपूर या गाडय़ांमध्ये प्रतीक्षा यादी भरपूर आहे. परंतु मुंबईसाठी सोडण्यात येणारी विशेष ट्रेन मात्र रिकाम्या आहेत.
२३ मेपर्यंत दिल्लीकडे जाणाऱ्या ग्रँड ट्रंक एक्सप्रेसमध्ये जागाच नसल्यामुळे तिकीट मिळणेही बंद झाले आहे. तामीळनाडू एक्सप्रेसमध्ये वेटिंग सुरू आहे. २४ मे दक्षिण एक्सप्रेस, १४ मे आणि १९ मेपर्यंत आंध्र एक्सप्रेस व केरला एक्सप्रेसचे सेकंड क्लासचे तिकीट मिळणे बंद झाले. दक्षिणेकडे जाणाऱ्या तामिळनाडू, ग्रँड ट्रंक, जयपूर, मद्रास, निजामुद्दिन, संघमित्रा, संपर्क क्रांती या सर्व एक्सप्रेस गाडय़ांमध्ये २२ मेपर्यंत आरक्षणाची स्थिती कठीण आहे. त्याचप्रमाणे हैदराबादकडे जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेस पटना-सिकंदराबाद एक्सप्रेस या गाडय़ांची प्रतीक्षा यादी ४०पर्यंत गेली आहे.